ब्लॅक अँड व्हाईट मुंबई, वार्ताहर
बोर्डाची परीक्षा जवळ आली की, विद्यार्थ्यांच्या जिवाची घालमेल सुरू होते. वेळ अपुरा, अभ्यास बाकी असतो, पालकांची वेगळी तणावग्रस्त धडपड. आपल्याला किती टक्के गुण मिळतील, पुढे चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळेल का? इत्यादी गोष्टी सतावत असतात. त्यांच्या मनात एक गहन तणाव, अनिश्चितता आणि कधीकधी निराशा देखील असते. सर्वेक्षणात ७०% विद्यार्थी “परीक्षेच्या दबावामुळे झोप कमी होत आहे” असे मान्य करतात......तर काही आजारी पडतात.
मुख्य कारणे
1. परिणामाची आशा – पालक, शिक्षक आणि समाजाकडून मिळणारी अपेक्षा अनेकदा आत्मविश्वासाला धक्का देते.
2. समय व्यवस्थापनाचा अभाव – प्रचंड अभ्यासक्रम आणि कमी वेळामुळे अभ्यासाचे संतुलन बिघडते.
3. सोशल मिडियाचा प्रभाव – अनेक प्रकारच्या रिल्स तणावात भर घालतात, तसेच फक्त अंकांवर चर्चा करणाऱ्या पोस्ट्समुळे तुलना वाढते.
4. विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व पण त्याला होत असणाऱ्या त्रासावर प्रभाव पाडते.
मानसिक तणावाचे लक्षणे
- सतत थकवा येणे, झोप न लागणे किंवा जास्त झोप येणे. डोके दुखी, चक्कर, अंधारी येणे इ.
- मनात सतत विचारांचे घोळ, निर्णय घेण्याची असमर्थता
- राग, चिडचिड, असहाय्य वाटणे किंवा उदासीन वाटणे
- आत्मविश्वास कमी होणे.
- अभ्यासात लक्ष केंद्रित न होणे
- केलेला अभ्यास विसरणे
विशेषज्ञांचे मत
समुपदेशक अपर्णा निमकर म्हणतात, “बोर्ड परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, भविष्यातील बरेच निर्णय, या परीक्षेच्या गुणांवर ठरत असते. या टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना भावनिक आधार अति आवश्यक आहे. नियमित व्यायाम, ध्यान आणि योग्य वेळापत्रक यामुळे तणाव कमी होऊ शकतो.”
सोपे उपाय
भितीवर नियंत्रण ....भिती वाटणे हे अगदी सामान्य लक्षण आहे, परंतु ही भिती प्रमाणाबाहेर गेल्यास विद्यार्थ्याचे मानसिक संतुलन बिघडू शकते. आणि मग अभ्यास आणि परीक्षेपासून ते परावृत्त होऊ शकतात. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी समुपदेशकांच्या सल्ल्याने, भिती कशाची आहे, त्याची कारणे कोणती आहेत हे माहित करून घेऊन त्यावर सांगितलेला उपाय केला पाहिजे.
- नियमित ब्रेक... प्रत्येक तासाच्या अभ्यासानंतर १० मिनिटांचा छोटा विश्राम घेणे आवश्यक आहे. हा विश्राम घेताना आपण काय करणार आहोत हेही तितकेच महत्त्वाचे. या वेळेत, थोडे चालणे, पाणी पिणे किंवा फळं खाणे, एखादं छान संगीत ऐकणे किंवा सरळ डोळे मिटून शांत बसणे या गोष्टी कराव्यात.
- शारीरिक सक्रियता... रोज ३० मिनिटे हलके व्यायाम किंवा योग.
- सकारात्मक संवाद...विद्यार्थी तसेच पालकांनी ‘परिणामापेक्षा प्रयत्नावर’ लक्ष देणे आवश्यक.
- मदत मागणे... तज्ञ समुपदेशक आपल्या खुप शास्त्रोक्त आणि योग्य पद्धती, अभ्यासाचे, वेळेचे, तणावाचे नियोजन कसे करावे याचे सुयोग्य मार्गदर्शन करू शकतात. त्याचा नक्की लाभ घ्यावा.
बोर्ड परीक्षा ही जीवनातील एक पायरी आहे, अंतिम गंतव्य नाही. विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य दिल्यास, त्यांच्या भविष्याची दिशाच नव्हे, तर समग्र समाजाची प्रगतीही सुनिश्चित होईल.
निमकर अपर्णा समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ
व्हॉट्स ॲप नंबर 8879794924
.jpg)

Post a Comment
0 Comments