कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचे नेतृत्वात बदल
आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२५, देशभरात ‘संविधान दिन’ साजरा होत असताना कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. डॉ. राजकुमार (राजा भाऊ) पातकर यांची आज कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे शहर काँग्रेसला एक दृढ, अनुभवी आणि जनसंपर्कात सदैव पुढे असलेला नेतृत्वकर्ता मिळाल्याचे मत काँग्रेस कार्यकर्त्यांतून व्यक्त केले जात आहे.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जिल्हाध्यक्ष पदावर राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरीष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र पातकर यांना पाठविण्यात आले आहे. तर आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून घराघरात काँग्रेस पक्ष पोहोचविण्यासाठी काम करणार असून आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महापौर बसविण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असे राजाभाऊ पातकर यांनी सांगितले. पातकर यांच्या नियुक्तीनंतर त्यांच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.


कॉंग्रेस पक्ष बळकटीकरण करण्यासाठी आपल्या सारख्या बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिली. पक्षाने दिलेल्या या संधीचे सोनं करणार असून काँग्रेसचा पंजा घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार. तर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी जरी राजीनामा दिला असला तरी त्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून कल्याण डोंबिवली महापालिकेत जो महापौर बसेल त्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल असे यावेळी राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments