ब्लॅक अँड व्हाईट ठाणे प्रतिनिधी
जिल्हा परिषद ठाणे येथील सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी कल्पना तोरवणे यांच्या सेवापूर्ती निमित्त दि. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांच्या हस्ते तोरवणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित राहून अधिकारीवर्ग आणि सहकाऱ्यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी आपल्या भाषणात कल्पना तोरवणे यांच्या शिस्तप्रिय व कार्यतत्पर वृत्तीचे कौतुक करत त्यांच्या सेवाभावाचे विशेष उल्लेख केले. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी त्यांच्या काटेकोर कामकाज व सकारात्मक दृष्टिकोनाबद्दल प्रशंसा व्यक्त केली.
कल्पना तोरवणे यांनी सन 1998 पासून जिल्हा परिषद सेवेत राहून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांनी प्रशासनात शिस्त, काटेकोरपणा आणि कार्यतत्परता राखत आपल्या कामाद्वारे अनुकरणीय आदर्श निर्माण केला. सेवेत असताना त्यांनी विधी शाखेची पदवी तसेच पत्रकारितेची पदविका प्राप्त करून शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे दाखवून दिले.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रशासनातील गुणवंत कर्मचारी म्हणून जिल्हा परिषदेचा कर्मचारी गौरव पुरस्कार प्राप्त केला आहे. त्यांच्या दीर्घ सेवेत त्यांनी संघटनेच्या आणि विभागाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान लक्षणीय ठरले आहे.
तोरवणे यांच्या कुटुंबीयांचा सहवास व साथ त्यांच्या यशामागे महत्त्वाची ठरली आहे. जिल्हा परिषद ठाणे परिवाराच्या वतीने त्यांना सेवानिवृत्तीनंतरचा काळ सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण जावो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
000
.jpg)

Post a Comment
0 Comments