ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत गोवर व रुबेला आजारांचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ५ ते १५ वर्षे वयोगटातील बालकांना गोवर-रुबेला (MR) लस दिली जाणार आहे.
मोहिमेचे उद्दिष्ट
1.जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरणाचे प्रमाण ९५% पेक्षा जास्त साध्य करणे.
2.MR लसीच्या दोन डोसमधील Drop out rate शून्यापर्यंत आणणे.
3.Non measles, Non rubella discard rate प्रति लाख लोकसंख्येमध्ये २ किंवा त्याहून जास्त साध्य करणे.
गोवर-रुबेला आजाराचे गांभीर्य
गोवर हा विषाणूमुळे होणारा साथीचा आजार आहे. त्याच्या गुंतागुंतीत अंधत्व, मेंदुज्वर, अतिसार, कानाचे व श्वसन संक्रमण (निमोनिया) दिसून येते. रुबेलामुळे गर्भवती स्त्रियांमध्ये व नवजात बालकांमध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात.
या आजारांवर विशिष्ट उपचार उपलब्ध नसले तरी MR लसीकरण हे सर्वात प्रभावी संरक्षण आहे.
मोहिमेची अंमलबजावणी
•३९ आश्रमशाळांतील १४ हजार १२३ बालकांचे MR लसीकरण चुकले असल्यास किंवा तारखा माहित नसल्यास त्या बालकांना एक डोस देण्यात येईल.
•प्रत्येक आश्रमशाळा/मदरशामध्ये लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येईल. एका चमूद्वारे दिवसाला १५० बालकांचे लसीकरण केले जाईल.
•प्रत्येक चमूमध्ये ६ सदस्य असतील – १ समुदाय आरोग्य अधिकारी, १ लस टोचक, १ आरोग्य सहाय्यक/एलएचव्ही, १ अंगणवाडी कार्यकर्ती, १ आशा व १ स्वयंसेवक.
•केवळ प्रशिक्षित कर्मचारीच लसीकरण करतील.
विभागांचा सहभाग-
या मोहिमेत आरोग्य विभागासोबत शिक्षण विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विभाग व महिला व बालविकास विभाग सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.
महत्वाचे मुद्दे
•तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण दिनांक ४ सप्टेंबर, २०२५ रोजी घेण्यात आले.
•जिल्ह्यातील लाभार्थी संख्येनुसार एकूण २१ हजार ४५० डोस लस उपलब्ध असून, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर साठा ठेवण्यात आला आहे.
•AEFI (लसीकरणानंतर विपरित घटना) व्यवस्थापनासाठी कर्मचारी व अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
•धार्मिक गुरु, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, पत्रकार यांच्यासोबत बैठका घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
•आश्रमशाळेतील शिक्षकांना मोहिमेची माहिती, पालकांशी संवाद व वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
“या मोहिमेचे यशस्वी होणे म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे सुरक्षित भविष्य घडविणे होय. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments