महिलांचे आरोग्य – सशक्त समाज व सक्षम देशाचा पाया
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबांच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे. त्यानुषंगाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या “पोषण महिना” उपक्रमाशी संलग्नित करून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे विशेष अभियान दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत देशभर राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राष्ट्रीय स्तरावरील शुभारंभ देशाचे मा. पंतप्रधान यांच्या शुभहस्ते मध्य प्रदेशातील इंदौर येथे होणार आहे.
अभियानाचा ठाणे जिल्ह्यातील उद्देश व व्याप्ती
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागात हे अभियान राबवले जाणार असून, महिलांचे सर्वांगीण आरोग्य तपासणी, रोगांचे लवकर निदान, मातृत्व व बालकांचे संरक्षण आणि पोषणाबाबत जनजागृती यावर भर दिला जाणार आहे. तसेच आभा (ABHA) म्हणजेच आयुष्मान भारत कार्ड व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM- JAY) अंतर्गत कार्ड काढण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. अभियानातील प्रमुख उपक्रम १) महिलांची आरोग्य तपासणी (Women’s Health Screening)
• उच्च रक्तदाब व मधुमेह निदान तपासणी.
• गर्भाशय मुखाचा, स्तनाचा व तोंडाचा कर्करोग निदान तपासणी.
• किशोरवयीन मुली व महिलांची रक्तक्षय तपासणी व समुपदेशन.
• क्षयरोग व सिकलसेल आजार तपासणी आणि आदिवासी भागात सिकलसेल समुपदेशन.
• स्त्रीरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ व दंततज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.
२) माता व बाल आरोग्य सेवा (Maternal and Child Care)
• गरोदर मातांची प्रसूतीपूर्व तपासणी (ANC check-ups) व समुपदेशन.
• माता व बाल संरक्षण (MCP) कार्ड वितरण.
• बालकांचे आवश्यकतेनुसार लसीकरण.
३) जनजागृती व वर्तन बदल (Awareness & BCC)
• किशोरी व महिलांसाठी मासिक पाळी स्वच्छता व पोषण सत्र.
• महिला बचत गट व स्थानिक संस्थामार्फत स्वयंपाकाच्या तेलाचा वापर १०% कमी करण्याबाबत जागृती.
• कुटुंबस्तरावर पोषण व निरोगी जीवनशैलीसाठी समुपदेशन.
४) निक्षय मित्र अभियान (Nikshay Mitra Drive)
• क्षयरुग्णांना दत्तक घेऊन ६ महिन्यांसाठी अन्नधान्य सहाय्य (फूड बास्केट).
• सामाजिक संस्था, उद्योग व दानशूर व्यक्तींना “निक्षय मित्र” म्हणून जोडून क्षयरोगमुक्त भारत अभियानाला गती.
५) रक्तदान शिबिरे (Blood Donation Camps)
• इंडियन रेड क्रॉस, सामाजिक संस्था व युवक संघटनांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे.
• १ ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनाच्या औचित्याने विशेष मोहीम.
• देशभर एक लाख युनिट रक्त संकलनाचे लक्ष्य.
६) खाजगी क्षेत्राचा सहभाग
• खाजगी रुग्णालये व दवाखान्यांच्या सहभागातून महिलांसाठी आरोग्य शिबिरांची व्याप्ती वाढविणे.
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी समन्वय
• सर्व आरोग्य संस्था, आयुष्मान आरोग्य मंदिरे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व शहरी रुग्णालये तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमधून शिबिरे.
• जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग.
• मा. खासदार, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व स्वयंसेवकांचा अभियानाशी जोडून व्यापक जनजागृती.
• महिला व बालविकास, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, युवक कल्याण, ग्रामीण विकास, नगर विकास विभाग इत्यादी सर्व विभागांचा समन्वय.
“हे अभियान महिलांचे आरोग्य व पोषण बळकट करून कुटुंबे व समाज सक्षम करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला या अभियानाचा लाभ मिळावा, यासाठी नागरिक, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती व सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments