ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडील मधल्या पुलाजवळील तथाकथित "डिलक्स टॉयलेट" - ज्याचे उद्घाटन मोठा गाजावाजा करीत उत्साहात झाले होते.वातानुकूलित स्वच्छतागृह असल्याने त्याचा वापर करण्यासाठी ठराविक शुल्क आकारले जात आहे.पुरुष आणि स्त्रिया यांच्या साठी समान सेवा असतांनाही स्त्रियांकडून जास्त शुल्क आकारले जात आहे.तरीही नागरिक मुकाट्याने सहकार्य करीत असतात.आता हेच वातानुकूलित स्वच्छतागृह फेरीवाल्यांच्या वस्तूंच्या गोदामात रूपांतरित झाले आहे. हे स्वच्छता गृह नागरिकांना सेवा देण्याऐवजी ते भीती, लाजिरवाणेपणा आणि निराशेचे ठिकाण बनले आहे.विशेषतः महिला प्रवाशांसाठी हे जास्तच अवघड झाले आहे.
ही घटना उघडकीस आली त्याचे निमित्त होते,एक महिला प्रवासी जेव्हा ह्या स्वच्छता गृहाचा वापर करण्यासाठी गेली असता तिला तिथे धक्कादायक बाब पाहायला मिळाली. (मुळात स्वच्छता गृहाचा वापर करून मग त्या बद्दलचे जे काही शुल्क असेल ते देणे अपेक्षित असतांना वापर करण्या अगोदरच शुल्क मागितले जाते.) ह्या महिलेने जेव्हा गुगल पे द्वारे ५ रुपये भरल्यानंतर महिलांच्या शौचालयात प्रवेश केला तेव्हा तिला तिथे आत एक पुरूष झोपलेला आढळला. तिने या बद्दल आवाज उठवला तेव्हा बाहेर असलेल्या परिचारिकेने अगदी सहज,जसे काही विशेष घडलेच नाही अशी प्रतिक्रिया दिली... "आदमी सोया है, आप जा सकती हो "या प्रसंगी सदर महिला घाबरून सुविधा न वापरताच बाहेर तातडीने बाहेर पडली.
प्रश्न असा आहे की महिलांच्या स्वच्छता गृहात पुरुष झोपू कसा शकतो ?
ह्या संबंधी अनेक प्रवाशांचा आरोप आहे की असा गैरवापर नित्याचा झाला आहे. कंत्राटदार युरीनल साठीही बेकायदेशीरपणे २ रुपये वसूल करतात, तर फेरीवाले मुक्तपणे महिलांच्या शौचालयात आणि आसपासच्या परिसरात त्यांचे सामान टाकतात.पूर्वेकडील आरपीएफ आणि जीआरपी कार्यालये प्लॅटफॉर्म क्रमांक १ (पश्चिम) वर हलवण्यात आल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. प्रभावी पोलिसिंग नसल्याने फेरीवाले आणि ऑटोरिक्षा चालकांनी रामनगर तिकीट घर,तसेच मधला पूल, लिफ्ट आणि पार्किंग क्षेत्रे या प्रमुख प्रवेशद्वारांवर ह्या फेरीवाल्यांनी ताबा घेतला आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी, बेकायदेशीर ऑटो रिक्षा प्रवेशद्वार अडवतात, ज्यामुळे नोकरदार वर्गाला स्टेशनवर जातांना आणि येताना एकमेकांना अंग घासत जावे लागते. महिलांची जास्त कुचंबणा होत असते. वास्तविक हाकेच्या अंतरावर वाहतूक नियंत्रण शाखेचे कार्यालय असतांनाही,आणि त्याच बाजूला रामनगर पोलिस ठाणे असतांनाही ही परिस्थिती आहे,या सारखे दुर्दैव कोणते ?
वरील घटने बद्दल डोंबिवली स्टेशन मास्तरांशी संपर्क साधला असता, त्यांनी वारंवार तक्रारी येत असल्याचे मान्य केले: "महिलांच्या शौचालयात साहित्य ठेवणाऱ्या हॉकर्समुळे महिलांना सुविधा वापरणे कठीण होते. नवीन फूट ओव्हरब्रिजसाठी जुने प्लॅटफॉर्म शौचालय पाडल्यानंतरही तक्रारी सुरूच आहेत."
आरपीएफ प्रभारी गजेंद्र राऊत यांनी कारवाईचे आश्वासन दिले: "मी माझ्या कर्मचाऱ्यांना शौचालयांचा गैरवापर करणाऱ्या कंत्राटदार आणि फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश तात्काळ देईन."
या संदर्भात खरंच काही कारवाई झाली की नाही हे कळले नाही.परंतु तरीही प्रवाशांचा आरोप आहे की, फेरीवाले निर्भयपणे काम करतात आणि अनेकदा प्रवाशांची थट्टा करतात.रेल्वे अधिकारी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असतात. हे वारंवार दिसून येत असते.
रेल्वे स्टेशनच्या बाहेर 150 मीटर अंतरापर्यंत कोणताही फेरीवाला दिसता काम नये. असा न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतांनाही संबंधीत रेल्वे अधिकारी आणि शहर पोलिस अधिकारी,आणि महापालिकेचे संबंधित अधिकारी न्यायालयाचा उघड उघड अवमान करतांना दिसत आहे आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही.ह्यांच्या निष्क्रियतेमुळे प्रत्येक स्टेशन बाहेर फेरीवाल्यांच्या मुजोरीला आणि त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.ह्या फेरीवाल्यांच्या विरोधात नुकतेच काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अनेक दिवस उपोषण केले होते.त्या वेळी अधिकाऱ्यांनी तात्पुरती खानापूर्ती करून वेळ मारून नेली.एक दोन दिवस परिस्थिती नीट राहिली,परंतु तिसऱ्या दिवशी सर्व काही पुरवत सुरू झाले.भ्रष्टाचारी पालिकेचे कर्मचारी अधिकारी यांच्या आशीर्वादा शिवाय ही होऊ शकते का ?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या कराच्या पैशातून नागरिकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लाखो करोडोंच्या योजना राबविण्यात येतात.परंतु भ्रष्टाचाराने पोखरलेली सर्व शासकीय यंत्रणा आणि मुजोर झालेले फेरीवाले,तसेच रिक्षावाले यांच्या दहशतीच्या छायेखाली नागरिक वावरतांना दिसत आहे.
या संबंधी महिला प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. ZRUCC च्या माजी सदस्या आणि महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनवणे म्हणाल्या: "रेल्वे स्वच्छतागृहे फेरीवाल्यांच्या सामानासाठी गोदामात रूपांतरित झाली आहेत. महिलांच्या स्वच्छतागृहांचा वापर भलत्याच कामांसाठी करण्यात येत आहे. ही बाब मर्यादेच्या बाहेरची आहे.
महिला सुरक्षेबद्दल आणि योजना जाहीर करण्याबद्दल राजकीय पक्षांचे नेते नेहमीच पुढे धावत सुटतात श्रेय लाटण्याच्या नादात केवळ घोषणा केल्या जातात, पण डोंबिवली स्टेशनवरील वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. महिला येथे रात्रंदिवस लोकलची वाट पाहत असतात, तरीही त्यांना शौचालयाचा वापरही करता येत नाही. ही एक अतिशय गंभीर समस्या आहे.आता पालिका प्रशासन, आरपीएफ आणि जीआरपीने ह्या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची वेळ आली आहे.
Post a Comment
0 Comments