ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाढत चाललेले खड्डे आणि त्यातून होणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे मनसे आक्रमक झाली आहे. आज मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवली पूर्वेतील सर्वेश हॉल चौकात टाळ-मृदुंगाच्या गजरात अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी खड्ड्यांभोवती रांगोळी काढत केडिएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. "जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असूनही प्रशासन आणि निवडून आलेले सत्ताधारी लोकप्रतिनिधी करत आहेत," असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अपघातांची संख्या वाढत असून जीवितहानीची शक्यता कायम आहे. त्यामुळे तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी मनसेने केली आहे. संपूर्ण आंदोलन पारंपरिक टाळ-मृदुंगाच्या गजरात पार पडले. त्यामुळे या आंदोलनाला वेगळेच आकर्षण लाभले असून नागरिकांनीही आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला. मनसेच्या या अनोख्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Post a Comment
0 Comments