ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
१ ऑगस्ट लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी केली जाते. त्याच बरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही साजरी होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने वरील दोन्ही कार्यक्रम सादर केले. लोकमान्य टिळकांचे विचार आजही महत्त्वाचे आहेत का? लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक, टिळकांच्या शिक्षणावरील विचार व विद्यार्थ्यांना दिलेले संदेश, लोकमान्य टिळकांचा जीवन प्रवास, टिळकांचा पत्रकारितेतील वाटा आणि केसरीचा प्रभाव यासारखे विषय शाळेकडून विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्तम तयारी करून टिळकांचे विचार उत्कृष्ट पद्धतीने मांडले. तसेच अण्णाभाऊ साठे यांचा जीवन प्रवाह देखील उलगडला.
भाषणांशिवाय टिळकांच्या जीवनावरील काव्य, स्वराज्याचा लेखाजोखा मांडणारे आणि सामाजिक कार्य वर्णन करणारे पोवाडे आणि त्यातूनच स्वातंत्र्य मिळेपर्यंत कार्याचा घेतलेला आढावा अतिशय बहारदाररित्या मांडला. नाट्यछटेतून छोट्या दोस्तांनी टिळकांचा दाखविलेला जीवनपट सुंदर होता. आठवीतील विद्यार्थिनी लावण्या पाटील लिखित आणि राधिका वैद्य हिच्या संकल्पनेतून साकारलेले नाटिका म्हणजे ' लोकमान्य टिळक एक प्रेरणा मूर्ती'. नाटिकेचे दिग्दर्शन केले होते दहावीतील स्वरदा मळेकर हिने. आजीने नातवाला सांगितलेल्या टिळकांच्या गोष्टी रूप इतिहासातून छोट्या छोट्या प्रवेशातून टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव, ब्रिटिशांना केलेला विरोध, ब्रिटिशांनी जनसामान्यांना दिलेला त्रास, टिळकांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे, आणि त्यांच्या इतर कार्याचे चित्र मंचावरून विद्यार्थ्यांसमोर अतिशय उत्तमरित्या साकार झाले. टिळकांचा जीवनपट विद्यार्थ्यांनी अनुभवला.
टिळकनगर शाळेचे पहिले मुख्याध्यापक कैलासवासी पद्माकर पुरोहित सरांच्या संकल्पनेतून सुरू असलेली स्वराज्य सभा आणि विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ यांचाही शपथविधी याप्रसंगी झाला. लोकशाही शासन पद्धती विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, शालेय विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन शिक्षकांना सहकार्य करावे, विद्यार्थ्यांना लोकशाहीचे महत्व कळून एक जबाबदार नागरिकत्वाचे बाळकडू शालेय जीवनापासूनच मिळावे या हेतूने ही स्वराज्य सभा गेल्या ५५ ते ६० वर्षापासून सुरू झाली ती आजतागायत चालू आहे.
वर्गावर्गातून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आरोग्य मंत्री, शिक्षणमंत्री, क्रीडामंत्री, पर्यावरण मंत्री, माहिती तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अशी विविध खाती विद्यार्थ्यांना दिली जातात. खाते वाटेपर्यंत झाल्यानंतर विद्यार्थी मुख्यमंत्री कौशल कारखानीस याने विद्यार्थ्यांना शपथ दिली. या विद्यार्थ्यांनी कामकाज नीट सांभाळावे म्हणून त्यांच्या सोबतीला प्रत्येकी एक मार्गदर्शक शिक्षक आणि अजून ३/४ विद्यार्थी दिले जातात. महिन्यातून एकदा सर्व सभासदांची सभा घेऊन झालेल्या कामकाजाचा आढावा घेणे, पुढील कार्यक्रमांचे नियोजन करणे आणि सभेचा अहवाल मुख्यमंत्री मुख्याध्यापकांना सादर करतात. असे हे शाळेचे विद्यार्थी मंत्रिमंडळ इतरही विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जाते. कार्यक्रमाची सांगता लोकमान्य टिळकांच्या आरतीने झाली.
या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक पर्यवेक्षक दिगंबर जोगमार्गे आणि उपमुख्याध्यापक नामदेव चौधरी यांनी केले. लीना ठाकूर यांनी "चला वंदू या लोकमान्या" ही प्रार्थना सांगितली. मंत्रिमंडळ परिचय मनिषा केंद्रे आणि ईश्वर वरठा यांनी दिला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सहाय्यक शिक्षिका विजया लोंढे आणि प्रज्ञा बापट यांनी केले. त्यांनी टिळकांचे देहवसान झाले त्यावेळी प्रसारित झालेल्या अग्रलेखांचे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वाचन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजश्री माळी आणि मुक्ता गड्डपवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पाटील, अमृता महाबळेश्वरकर आणि स्वरदा मळेकर यांनी केले. सर्व शिक्षकांची सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मुग्धा साळुंखे आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनीविशेष मार्गदर्शन केले.
Post a Comment
0 Comments