ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील युवक युवतींसाठी नवीन मतदार नोंदणी केल्यानंतर मोफत पॅन कार्ड पुरविणाऱ्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेचा प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन सोहळा आज शनिवार रोजी सकाळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याहस्ते डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या समोरील मतदार नोंदणी मंडपात पार पडला.
कल्याण लोकसभा क्षेत्रातील सदरची मतदार नोंदणी करणाऱ्यांसाठीची मोफत पॅन कार्ड पुरवणारी योजना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत दररोज सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत डोंबिवलीतील पूर्व आणि पश्चिम येथे विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. या मतदार नोंदणीच्या ठिकाणी नवीन मतदार नोंदणी करणाऱ्या १८ ते २५ वयोगटातील युवक युवतींसाठी नवीन नाव नोंदणी करणे, नवीन पॅन कार्ड काढणे तसेच मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांची यादीतील नाव, वय, जन्मतारीख, पत्ता व इतर गोष्टींमध्ये बदल करण्यासाठी येणाऱ्या नागरिक बंधू भगिनींनी खाली दिलेली कागदपत्रे आपल्या सोबत आणावीत.
आपले नाव मतदार यादीत यावे ह्या साठी नव तरुण तरुणींनी ह्या उपक्रमाचा लाभ घेऊन आपले नाव नोंदणी करून घ्यावे तसेच मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांनी आवश्यक असणाऱ्या दुरुस्ती या योजनेअंतर्गत करून घ्याव्यात असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे. डोंबिवली पश्चिमेतील फुले रोड रिक्षा स्टॅन्ड, मच्छी मार्केट समोर गुसे रोड, रेल्वे स्टेशन जवळ दिनदयाळ रोड, ट्रॅफिक ऑफिस समोर रेल्वे स्टेशन जवळ, शिवसेना मध्यवर्ती शाखे समोर, मानपाडा रोड, डोंबिवली ( पूर्व ) आदी ठिकाणी शिवसेना मतदार नोंदणी केंद्र ठिकाणं आहेत.
यावेळी आमदार राजेश मोरे यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनोहर पाटील, डोंबिवली शहर सचिव संतोष चव्हाण, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, गोरखनाथ म्हात्रे, युवासेना शहर अध्यक्ष सागर जेधे, खासदार कार्यालयाचे प्रकाश माने तसेच पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेले अनेक युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments