ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एसएसटी महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपल्या कलात्मकतेचा आणि प्रतिभेचा ठसा उमटवत मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवा महोत्सवात ठाणे प्रादेशिक (झोन) पातळीवर चमकदार कामगिरी केली. ठाणे येथील एनकेटीटी महाविद्यालयात झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत तब्बल ४५ महाविद्यालयांचा सहभाग होता. त्यामध्ये एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी मोनो अभिनय, माइम, हिंदी स्किट, शास्त्रीय नृत्य आणि कथाकथन अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेत उत्तम कामगिरी केली. यामध्ये सर्व स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवून महाविद्यालयाचे नाव अभिमानाने उंचावले. अंतिम फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांमध्ये मोनो मराठी – ओम जाधव, माइम – क्रांती नरवडे, भाविन वखरे, यश मोहीते, लवीन मंडोल, प्राची गायकवाड, दृष्टी शिखरे, हिंदी स्किट – भक्ती जाधव, शक्तीवेल थोंडामन, क्रांती नरवडे, राज जाधव, सलोनी रोकडे, सानिका सावंत, शास्त्रीय नृत्य – द्विथी अमीन, कथाकथन (हिंदी) – फरीन शेख यांचा समावेश होताया यशामागे एसएसटी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सातत्याने दिलेली प्रेरणा महत्त्वाची ठरली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवत त्यांनी नेहमीच त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. संजीवनी सांस्कृतिक विभागासह प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक कौतुक व्यक्त केले असून, आगामी अंतिम फेरीत ते आणखी उज्ज्वल यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment
0 Comments