महराष्ट्राच्या भाजपा प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. सध्या ते महाराष्ट्र भाजपचे कार्याध्यक्षपद म्हणून काम करत होते.
विधानसभा निवडणूकीनंतर मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने काहीसा नाराज असलेल्या चव्हाण यांना पक्षश्रेष्ठींनी दिलेले प्रदेशाध्यक्षपदाचे आश्वासन पूर्ण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोकण आणि इतर भागांत पक्षविस्तारावर भर देण्याचा निर्धार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोकणात पक्षवाढीसाठी चव्हाण यांच्या योगदानाचे कौतुक केले हाेते.
ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा
आज मुंबई येथे आता प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांची निवड करण्यात आली. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून चव्हाण हे सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आषिश शेलार, विनोद तावडे यासह भाजपाचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील वरळी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. अंत्यंत भव्यदिव्य अशा या कार्यक्रमाला आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. सर्व आसन व्यवस्था फुल्ल झाल्याने भाजप कार्यकर्त्यांना उभे राहून कार्यक्रम पाहावा लागला.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे महसूल मंत्री झाल्याने प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदासाठी रविंद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते. ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जानेवारी २०२५ मध्ये त्यांच्याकडे राज्याच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
रविंद्र चव्हाण हे भाजपच्या युवा मोर्चातून राजकारणात आले असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, चार वेळा आमदार, भाजप प्रदेश सरचिटणीस, मंत्रीपद अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. डोंबिवली मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कारकिर्दीस सुरुवात करून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे
रविंद्र चव्हाण यांच्या निवडीमुळे भाजपच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाला नवे नेतृत्व मिळाले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षात नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Post a Comment
0 Comments