ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर संचालित सिताराम रामा पाटील विद्यालय व रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय आमणे, ता. भिवंडी, जिल्हा - ठाणे येथील सहशिक्षक श्री. सुनील मारुती म्हसकर यांच्या 'चला वाचू आनंदे...' ह्या लेखाला "जीवन शिक्षण" व "शिक्षण संक्रमण" माहे एप्रिल २०२५ च्या मासिकांत प्रसिद्धी मिळाली आहे. साहित्यिक सुनील म्हसकर हे 'शारदासुत' म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध आहेत. ते एक हाडाचे उपक्रमशील शिक्षक असून उत्तम कवी, गायक, लेखक, प्रभावी व्याख्याते, मार्गदर्शक व समुपदेशक आणि व्यासंगी असे वाचक आहेत. 'चला वाचू आनंदे...' या लेखात त्यांनी वाचन म्हणजे काय, वाचनाचे प्रकार, विविध पुस्तकांचे वाचन का व कसे महत्त्वाचे आहे, आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सुखी व आनंदी जीवनासाठी वाचन कसे फायद्याचे ठरते, तसेच माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात आपण वाचन संस्कृती रुजविण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत इत्यादी मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला आहे.
शिक्षक, पालक व पर्यवेक्षकीय यंत्रणा यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात मार्गदर्शक म्हणून १९ व्या शतकात सुरु झालेले आणि शिक्षण व शिक्षणासाठीच वाहिलेले तसेच १६५ वर्षाची गौरवशाली व वैभवशाली परंपरा असलेले महाराष्ट्रातील पहिले मासिक म्हणजे “जीवन शिक्षण”. सध्या महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून "जीवन शिक्षण" हे मासिक ओळखले जाते. या मासिकाचे प्रकाशन राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यरत असणाऱ्या व राज्य शासनाची एक प्रमुख शिखर संस्था म्हणून काम पाहणाऱ्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या प्रसारमाध्यम विभागामार्फत केले जाते. शासनाची ध्येय-धोरणे व प्रत्यक्ष कृती-कार्यक्रम आणि अपेक्षित शालेय स्तरावरील अंमलबजावणी व परिणाम यांच्यातील दुवा म्हणून "जीवन शिक्षण" हे मासिक कार्यरत आहे.
जीवन शिक्षण हे मासिक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या जीवन कौशल्यांवर आधारित आहे. हे मासिक शिक्षकांना त्यांच्या अध्यापन प्रक्रियेत जीवन कौशल्यांचा समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन करते. शिक्षणक्षेत्रातील नवनवीन तंत्रे, पद्धती, विचार, कल्पना, संशोधने इत्यादी बाबत शिक्षक व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील अधिकारी यांना अद्ययावत माहिती पुरवून त्यांची क्षमता वृद्धी केली जाते. राज्यातील जिल्हा परिषदांच्या जवळपास ६०,००० हून अधिक शाळांना या मासिकाचे दरमहा मोफत वितरण करण्यात येते. याच सोबत वर्गणीदार व देणगीदार यांना हा अंक पोस्टामार्फत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जातो.
तर "शिक्षण संक्रमण" हे शालेय शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे एक शैक्षणिक मासिक आहे. या मासिकात शिक्षण क्षेत्रातील नवीन विचार, शैक्षणिक उपक्रम, दिनविशेष, मूल्यमापन पद्धती, शैक्षणिक तत्त्वज्ञान, अभ्यासक्रमातील बदल, अध्यापन पद्धती, परीक्षा पद्धती, आणि शासकीय परिपत्रके यांसारख्या विषयांवर लेख प्रकाशित केले जातात. शिक्षण संक्रमण मासिकाचा मुख्य उद्देश शिक्षकांसाठी अद्ययावत ज्ञान देणे तसेच शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची माहिती देणे आहे.
दरम्यान, मासिकांची रचना, नाविन्यपूर्णता आणि आकर्षक मांडणी इत्यादी गुणवैशिष्ट्यामुळे राज्यभरातील अधिकारी व शिक्षक वर्गाचे आवडत्या असणाऱ्या "जीवन शिक्षण" व "शिक्षण संक्रमण" या नामांकित अशा दोन्ही मासिकांत सुनील म्हसकर सर यांचा लेख प्रसिद्ध झाल्याने त्यांच्या लेखनाचे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, अधिकारी वर्ग तसेच साहित्यिक व चोखंदळ वाचक अशा अनेकांकडून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments