"आयुष्यात उच्च ध्येयाची नशा करा ! अमली पदार्थाची नाही"
- अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव .
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आयुष्यात नशा करा पण ती अंमली पदार्थांची नाही, तर उच्च ध्येयाची करा. अमली पदार्थाची कीक मारण्यापेक्षा, फुटबॉलला किक मारा. फुटबॉलची किक तुमचं आयुष्य उजळून टाकेल पण अंमली पदार्थांची किक तुमचं आयुष्य जाळून टाकेल म्हणून अमली पदार्थां पासून दूर राहा असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना केले. बिर्ला कॉलेज येथे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव आणि पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या संकल्पनेनुसार सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अमरनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव हे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते.
ते पुढे म्हणाले मी देखील कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो, मी देखील कॉलेजमध्ये धमाल केली, मस्ती केली परंतु माझ्या आय.पी.एस होण्याच्या ध्येया पासून लक्ष विचलित होऊ दिले नाही. त्यामुळेच आज मी तुमच्यापुढे आय.पी.एस म्हणून उभा आहे. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात पोलिसांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ नरेशचंद्र, प्राचार्य अविनाश पाटील, दिशा फाउंडेशन संस्थेचे संस्थापक डॉ राजेंद्र कुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलीस विभागातर्फे कल्याण डोंबिवली परिसरात पदार्थ विरोधी करण्यात येत असलेल्या कारवाईची माहिती दिली. अमली पदार्थ विरोधी जनजागृती करिता खडकपाडा सर्कल ते बिर्ला कॉलेज पर्यंत अशी मुथा कॉलेज, सोनवणे कॉलेज आणि बिर्ला कॉलेज या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची व पोलीसांची पायी रॅली आयोजित करण्यात आली होती. बिर्ला कॉलेज येथील विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी जनजागृती करणारा मूक अभिनय ॲक्ट सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी उपस्थित ७०० ते ८०० विद्यार्थ्यांसह सर्वांनी सामुदायिक अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली. तसेच खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आलेल्या नशा मुक्तीवर आधारित ई पोस्टर्स चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजिता घोडेगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. किशोर देसाई यांनी केले.
Post a Comment
0 Comments