Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

२७ गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष समितीने केडीएमसी आयुक्तांची घेतली भेट,

 

डुप्लीकेट कोण आणि खरे कोण हे लोकांना

सांगायची आवश्यकता नाही – गुलाब वझे


                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर

कल्याण डोंबिवलीतील २७ गावांच्या विविध समस्यांबाबत आज २७ गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह इतर पदाधिकारयांनी  आज कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली.  

२७ गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायतीत असलेले ४९९ सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समावून घ्यावे, सावळाराम महाराज स्मारकाच्या कामाचा डीपीआर लवकर तयार करण्यात यावा, त्यासाठी अतिरिक्त वास्तूविशारद राजू तायशेट्ये यांची नियुक्ती करावी, २७ गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्रे महापालिकेत घ्यावीत, महापालिकेने कचरा संकलनासाठी नेमलेल्या खाजगी कंपनीत भूमीपूत्रांना देखील रोजगाराची संधी द्यावी, त्याचबरोबर २७ गावातील रस्ते गटारे यांच्या कामासाठी निधी द्यावा, या विविध मागण्यांसाठी आयुक्त गोयल यांच्यासोबत चर्चा करुन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.



 या प्रश्नावर आयुक्तांनी सकारात्मकता दर्शविली आहे, गरज पडल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या सोबतही या संदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले. तर दोन दिवसांपूर्वी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली डोंबिवलीत संपन्न झालेल्या बैठकीत डूप्लीकेट संघर्ष समिती अशी टीका करण्यात आली होती. याबाबत वझे यांना विचारले असता, सुरेश म्हात्रे अध्यक्ष होऊन 10 महिने झाले. 10 महिन्यांनंतर मिटिंग घेतली परंतु आमच्या सतत मिटिंग सुरु असून लोकांच्या विकासाची कामे करत आहोत. आमची समिती जर डुप्लीकेट असती तर ४९९ कामगार आमच्या बाजूने का राहिले असते. आज त्यांचा प्रश्न सुटत आहे.

२७ गावातील रस्त्यासह अनेक प्रश्न सोडविण्याचा काम आम्ही करतोय. ९०० कोटींचा कर आम्ही कमी केला. त्यामुळे जनता कोणासोबत आहे ते आम्हाला माहिती असून डुप्लीकेट कोण आणि खरे कोण हे लोकांना सांगायची आवश्यकता नसून त्यांचा विश्वास आमच्यावर असल्याचे गुलाब वझे यांनी सांगितले. त्यांच्या बैठकीत राजकारण होत असल्याचे दिसून आले. स्वतंत्र नगरपालिकेची आमची भूमिका कायम असून आम्ही विकासासोबत असल्याचे वझे यांनी सांगितले. तर आगरी समाजासाठी कोण काम करत आहे हे सर्वांना माहिती असल्याचा उल्लेख देखील त्यांनी केला. एकूणच दोन्ही संघर्ष समिती आक्रमक झाल्याने आगामी काळात येथील राजकारण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे.    


Post a Comment

0 Comments