Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

पालकांसाठी सुट्टीचा गृहपाठ जि.प.भुवन शाळेचा अनोखा उपक्रम

 

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 १ मे २०२५ सर्व शाळांचा वार्षिक निकाल जाहीर झाला आणि शाळांना उन्हाळी सुट्टी लागली. एरव्ही मुलांच्या कलकलाटाने किलबिलणार्‍या शाळा सुट्टीमुळे तब्बल दीड महिना मुक्या व अबोल होणार. विद्यार्थ्यांनी सुट्टीत काय करणार, कोठे जाणार याचे नियोजनदेखील केले असणार. आता परीक्षा नाही, अभ्यास नाही, गृहपाठ नाही. नुसती मजा, आता गृहपाठ करण्याची वेळ मुलांच्या पालकांची... हो अगदी बरोबर वाचलेत ! कारण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा भुवनच्या शिक्षकांनी मुलांच्या पालकांनाच उन्हाळी सुट्टीचा अभ्यास म्हणून गृहपाठ (Homework for Parents) दिला आहे.  

     या गृहपाठात शाळेतील शिक्षकांनी पालकांना दिलेल्या पत्रात महातले आहे की, दहा महिन्यांपासून तुमच्या मुलांची काळजी घेण्यात आम्हाला आनंद झाला. पुढील दोन महिने तुमच्या सोबत घालवले जातील, एक शिक्षक म्हणून आम्ही काही गोष्टी सांगत आहोत त्या पालकांनी त्यांनाच्या मुलांसोबत करण्याचे आवाहन केले आहे. पालकांसाठी सुट्टीचा गृहपाठ या उपक्रमात त्यांच्यासाठी उपयुक्त आणि आनंदी ठरतील अशा काही गोष्टी पालकांनी मुलांसोबत, मुलांसाठी कराव्यात असे सुचवले आहे.

     यामध्ये पालकांनी खालील गृहपाठ करायचा आहे.  १. मुलांसोबत किमान दोन वेळा जेवण करा. त्यांना शेतकऱ्यांचे महत्त्व आणि त्यांच्या मेहनती बद्दल सांगा. आणि त्यांना अन्न वाया घालवू नका असे सांगा. २. जेवल्यानंतर त्यांना स्वतःची ताटे धुवू द्या. अशा कामांतून मुलांना मेहनतीची किंमत कळेल. ३. त्यांना तुमच्याबरोबर स्वयंपाक करण्यास मदत करू द्या. त्यांच्यासाठी भाज्या निवडणे किवा सलाड तयार करणे अशी कामे करू द्या. ४. शेजारांच्या घरी मदतीसाठी येत-जात राहण्यास सांगा. त्यांच्याबदल आदर व आपुलकी बाळगण्यास सांगा. ५. मुलांशी जास्तीतजास्त बोला त्यांची आवड-निवड, मित्र-मैत्रिणी, याविषयी अधिक जाणून घ्या आणि त्यांच्या जवळ रहा. ६. मुलांना आजी-आजोबांच्या सोबत ठेवा, त्यांना मुलांमध्ये मिसळू द्या. त्यांच्या सोबत वेळ घालवू द्या. त्यांचे प्रेम आणि भावनिक आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. ७. फिरायला गेल्यास किंवा कार्यक्रमाप्रसंगी मुलांसोबत फोटो काढा. ८. त्यांना तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जा जेणेकरून तुम्ही कुटंबासाठी किती मेहनत करता हे त्यांना समजेल. ९. त्यांच्यासोबत स्थानिक सण साजरे करा, किंवा स्थानिक बाजारपेठेत सोबत न्यायला विसरू नका. १०. बाग, फुलझाडे कुंड्या तयार करण्यासाठी मदत घ्या. तुमच्या मुलांना बिया पेरण्यास, झाडे लावण्यास प्रवृत्त करा. मुलाच्या विकासासाठी ही कृती देखील महत्त्वाची आहे. ११. मुलांना तुमचे बालपण आणि कौटुंबिक इतिहास सांगा. १२. तुमच्या मुलांना बाहेर जाऊन खेळू द्या, त्यांना दुखापत होईल याची भीती घालू नका. त्यांना माखू द्या. अधूनमधून पडणे आणि वेदना सहन करणे भविष्यातील आव्हाने स्विकारण्यासाठी चांगले आहे. १३. सोफा कुशनसारखे आरामदायी जीवन तुमच्या मुलांना आळशी बनवेल, सुट्टीत नुसते लोळून देऊ नका. कामात व्यस्त ठेवा. १४. त्याना कुत्रा, मांजर, पक्षी किंवा मासे असे कोणतेही पाळीव प्राणी पाळू द्या. १५. त्यांना त्यांच्या आवडीची काही गाणी, लोकगीते गायला, नाचायला व वाजवायला शिकवा. १६. तुमच्या मुलांसाठी रंगीबेरंगी चित्रांसह काही कथा पुस्तके वाचनासाठी आणून द्या. १७. तुमच्या मुलांना टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्यूटर आणि इलेक्टॉनिक गॅझेट्सपासून दूर ठेवा. त्यांना खेळ खेळू द्या. १८. रांगोळी, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर या सारखे छंद किंवा कला जोपासण्यास मदत करा. १९. त्यांना चॉकलेट, जेली, क्रीम, केक, चिप्स, बाजारातील पेये आणि बेकरी उत्पादने आणि तळलेले पदार्थ देणे टाळा. २०. तुमच्या मुलांच्या डोळ्यात पहा आणि तुम्हाला अशी अद्भूत भेट दिल्याबद्दल देवाचे आभार माना. आतापासून येत्या काही वर्षांत ते नवीन उंचीवर असतील. पालक म्हणून तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मुलांना देणे महत्त्वाचे आहे. २१.या गृहपाठामध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द आपल्याला सांगतो की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा यासर्व गोष्टी आपल्या जीवनशैलीचा एक भाग होत्या ज्याने आपण मोठे झालो, परंतु आज आपली मुले या सर्व गोष्टीपासून दूर आहेत, त्यांना त्या मिळू द्या ज्यामुळे आपण स्वतःही त्यांच्यासोबत आनंदी असू. 

     जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा भुवन या शाळेने राबवलेल्या “पालकांसाठी सुट्टीचा गृहपाठ” या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत होत असून आम्ही हा गृहपाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास दिला आहे. या उपक्रमाचे नियोजन केंद्रप्रमुख मा. श्री. गुरुनाथ घुडे सर, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. बाळकृष्ण गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाशिक्षक श्री. राजाराम सोंगाळ सर, श्री. बाळकृष्ण इसामे सर, श्री. संतोष जामघरे सर, सौ. जयश्री शेलवले मॅडम, व श्री. दिलीप खाटेघरे गुरुजी यांनी राबविला आहे. आणि सर्व पालकांनी या गृहपाठाचे चांगले अभिप्राय येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments