ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आय प्रभागात गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले रस्ता रुंदीकरण व गटारीचे काम अखेर गुरुवारी सुरू करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने या कामास सुरुवात केली.
काम सुरू करताना माणेरे गावातील काही गाळेधारक आणि स्थानिक नागरिकांकडून कामात अडथळा निर्माण करण्यात आला. संबंधित भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलीस प्रशासनाने परिस्थिती शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, तसेच मागील कृष्णानगरी चाळीमध्ये पावसाचे पाणी शिरू नये म्हणून महापालिकेने तात्काळ ११ गाळेधारकांवर निष्कासन कारवाई केली. यामध्ये अनधिकृत शेड, ओटे आणि अडथळा निर्माण करणारे साहित्य काढून टाकण्यात आले. त्यानंतर वादग्रस्त ठिकाणी जुनी गटार व्यवस्था शोधून काढण्यात आली आणि ती मुख्य नाल्याशी मार्किंगनुसार जोडण्यात आली.
निष्कासन कारवाईनंतर रस्ता रुंदीकरण व गटारीचे काम त्वरित सुरू करण्यात आले असून. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागात रेडियम पट्ट्या व 'डेंजर' अशी चिन्हे लावण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या या तातडीच्या आणि ठोस कारवाईमुळे गेली अनेक महिने रखडलेले महत्त्वाचे काम मार्गी लागले असून, लवकरच परिसरातील नागरिकांना सुधारित रस्ता आणि सांडपाणी निचरा सुविधांचा लाभ मिळणार आहे.
.jpg)



Post a Comment
0 Comments