ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी आदर्श तरुण मित्र मंडळ सवादे (मुंबई) आणि पंचशील मित्र मंडळ सवादे, ता.कराड, जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे सवादे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीचा उत्सव संपन्न झाला.
याप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते आणि साहित्यिक शारदासुत सुनील म्हसकर व प्रसिद्ध कराओके गायक महादेव कोचरेकर हे विशेष निमंत्रित अतिथी म्हणून उपस्थित होते. तर मंडळाचे प्रेरणास्थान व सल्लागार सुरेश सागरे, मंडळाचे अध्यक्ष संजय पोपट सागरे, माजी शिक्षणाधिकारी संपतराव सवादकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रसिद्ध व्याख्याते आणि साहित्यिक शारदासुत सुनील म्हसकर यांनी 'युगपुरुष भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण ही आजच्या काळाची गरज' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, "आज जगात शांतता हवी असेल तर भगवान गौतम बुद्धांनी दिलेला दया, क्षमा व शांततेचा उपदेश सर्वांनी पाळणे, ही काळाची गरज आहे. जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा आहे. भगवान बुद्धांनी आणि डॉ.आंबेडकरांनी दिलेली शिकवण आज आपण प्रत्यक्ष कृतीत आणली पाहिजे. मानवी मूल्ये व संविधानिक मूल्ये यांचा अंगीकार केला पाहिजे. आपण बौद्धिकता व नैतिकतेचा विकास करून, सत्याची कास धरून, समता, बंधुता व एकता आदी वैश्विक मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. समाजसेवेच्या भावनेचा विकास करून, आपल्या प्रत्येक सुयोग्य कृतीत आनंद व समाधान मानून तसेच एकाग्रता आणि मनाची शुद्धी हे पैलू विकसित करून मोक्षाकडे वाटचाल केली पाहिजे. प्रज्ञा, शील व करुणा या तीन तत्वांबरोबरच त्रिरत्न, आर्यसत्ये व पंचशील तत्वे यांचा जाणतेपणाने अंगीकार केल्यास आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास तर होईलच परंतु त्यातून समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास झाल्याखेरीज राहणार नाही..."
सदर कार्यक्रमास मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप सागरे, सचिव गौतम सागरे, खजिनदार संजय कृष्णाजी सागरे,विनोद कांबळे, सौ.प्रफुल्ला बाबासाहेब कांबळे,प्रणाली कांबळे, सौ.रुपाली प्रशांत कांबळे आदी ग्रामस्थ व अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध कराओके गायक महादेव कोचरेकर यांनी भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विविध गीते सुमधुर व मंजुळ सुरात सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी लहान मुलांसाठी संगीत खुर्चीचा खेळ घेण्यात आला. तर कुमारी प्रांजल बाबासाहेब कांबळे,प्रणवी प्रशांत कांबळे,श्वेता प्रदीप सागरे,ऐश्वर्या व अंतरा कांबळे,अक्षरा वीर,श्वेता सागरे,साहिल दंडवते आदींनी सुंदर नृत्ये सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मंडळाच्या वतीने उत्कृष्ट नृत्य सादर करणाऱ्या तसेच विविध स्पर्धांमध्ये नैपुण्य संपादन करणाऱ्या स्पर्धकांचे पुस्तक रूपाने बक्षिसे देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी मान्यवरांचा परिचय व त्यांचे स्वागत सुरेश सागरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय सागरे यांनी केले. संपतराव सवादकर व डॉ. प्रशांत कांबळे यांनी उत्तम भाषणे सादर केली. माजी मुख्याध्यापिका सुशीला सवादकर यांनी सुंदर मनोगत व्यक्त केले. आयु.प्रशांत सुरेश सागरे यांनी उपस्थितांना भोजनाचा तर राजेंद्र सागरे यांनी मिष्ठांनाचा लाभ देऊ केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.प्रशांत कांबळे यांनी केले तर मंडळाचे अध्यक्ष संजय सागरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
.jpg)

Post a Comment
0 Comments