Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अखेर स्वयंचलित मशीनद्वारे उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम आजपासुन सुरु..

   

22 मार्च 2025 जागतिक जल दिनी मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, कैलास शिंदे, श्रीनिवास घाणेकर, सुदाम गंगावणे यांचे नदी पात्रात बसुन आंदोलन सुरु झाले होते, 8 दिवसांनी राज्य शासनाद्वारे बैठक घेऊन 15 दिवसांत मशीन लावुन जलपर्णी काढण्यात येईल असे आश्वासन राज्य सरकार ने दिल्याने आंदोलन समाप्त करण्यात आले होते, अखेर स्वयंचलित मशीन लावुन उल्हास नदितील मोहना येथे जलपर्णी काढण्याचे काम आजपासुन सुरु करण्यात आले आहे.

          ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

ठाणे जिल्ह्यातील 50 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी ही मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे. कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रीत सांडपाणी मुळे नदीत वेगाने वाढत असलेली जलपर्णी दिसत आहे, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरातील गावांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे उल्हास नदीचे अनेक ठिकाणी नाल्यात रूपांतर झाले आहे. काही वर्षांपासून नदीपात्रात जलपर्णी फोफावत आहे. ह्यावर्षी एक महिन्यापासुन सतत आपटी, रायता, काम्बा, म्हारल, सिमा रिसोर्ट, रीजेंसी एंटीलिया ते मोहना एनआरसी बंधारे पर्यंत ही अवाढव्य जलपर्णी पसरत आली आहे,

मोहिली व मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात अडकत आहे,नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या औद्योगिक तसेच निवासी भागातील सांडपाण्यावर पुरेशा प्रमाणात आजही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.



आज सकाळीच उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी एका मशीनद्वारे काम सुरू करण्यात आले आहे ही जलपर्णी काढण्यासाठी दोन मशीन मागविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या दोन मशीनच्या माध्यमातून युद्धपातळीवर जलपर्णी काढली जाणार असल्याचे  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मशनरी कार्यान्वित करण्यात आल्या असून यातील पहिल्या मशनरीच्या मदतीने उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. मात्र या नदीत येणारे सांडपाण्याचा बंदोबस्त करणे हाच जलपर्णी मुक्त नदीपात्र करण्याचा उपाय असल्याचे मी कल्याणकर संस्थेचे नितीन निकम यांनी सांगितले.

पर्यावरण प्रेमींनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागणार असल्यास हे सांडपाणी नदी किनारी पाईप लाईन बसवून त्याद्वारे बंधाऱ्याच्या पलीकडील खाडीच्या भागात सोडण्याचा पर्याय सुचवला असून या पर्यायावर विचार करण्याच्या सूचना नगरविकास सचिवानी दिल्या आहेत. दरम्यान तूर्तास उल्हास नदी पात्रावर पसरलेली जलपर्णी काढण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियत्रण मंडळाला जबाबदारी देण्यात आली असून संबधित प्राधिकरणाकडून यासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला.

सदर कार्य हे महाराष्ट्र प्रदुषण मंडळ तर्फे करण्यात येणार आहे, जलपर्णी मशीनद्वारे काढून ती नदी किनारी ठेवली जाईल व स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायत द्वारे त्या जलपर्णी ची योग्य विल्हेवाट लावली जाईल अशी माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments