ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षण मिळावे. शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी म्हणून राज्यातील बालरक्षक चळवळीतील प्रत्येक शिक्षक संवेदनशीलतेने स्वतःला झोकून देत काम करत आहे.
राज्यभर विखुरलेल्या बालरक्षक शिक्षकांचा 'राज्यस्तरीय बालरक्षक मेळावा' नाशिक येथील औरंगाबादकर सभागृहात दि. ११/४/२०२५ रोजी पार पडला.
यावेळी किनो एज्युकेशन सोसायटी व महाराष्ट्र बालरक्षक टिम यांच्या वतीने बालकांच्या शिक्षणासाठी संवेदनशीलतेने स्वत:ला झोकून देत झपाटून काम करणार्या बालरक्षकांना राज्यस्तरीय बालरक्षक जीवन गौरव व बालरक्षक कार्य गौरव पुरस्कार प्रदान करून कौतुकाची थाप देण्यात आली. या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातून अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मानेरे येथील शिक्षिका सौ. चंदाराणी माधव कुसेकर यांना पूर्व शिक्षण सहसंचालक मा.शोभा खंदारे यांच्या हस्ते *बालरक्षक कार्य गौरव पुरस्कार २०२५* देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी शिक्षण क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाचा सन २०१८-१९ चा आदर्श शिक्षक राज्यपुरस्कार मिळाला आहे. याशिवाय अनेक सन्मान व पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सौ.चंदाराणी कुसेकर यांनी आपल्या सेवाकाळात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत बालशिक्षण, मुलींचे शिक्षण, केंद्रपुरस्कृत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय(KGBV) योजने अंतर्गत डहाणू, तलासरी,विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील
आदिवासी व शाळाबाह्य, गरीब मुलींच्या निवासी शिक्षणाची महत्वाची जबाबदारी समन्वयक म्हणून पार पाडली आहे. तसेच अनेक शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात दाखल केले आहे. त्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत करतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी, विद्यार्थ्यामध्ये जीवन कौशल्य, नैतिक मूल्यांची जोपासना, चांगले संस्कार रुजविण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमातून आनंददायी अध्ययन अध्यापन पद्धती राबवित असतात. याशिवाय राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर ही त्यांचा विविध प्रशिक्षण कार्यशाळा आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो.
पूर्व शिक्षण सहसंचालक शोभा खंदारे यांनी "शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दर्जेदार शिक्षण देणे, ही आपली जबाबदारी आहे." असे आवाहन उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले.
या कार्यक्रमाला टी. डी. आर. एफ. चे संचालक मा. हरिश्चंद्र राठोड, पूर्व शिक्षण सहसंचालक मा. ई. जे. ठाकरे, शिक्षणाधिकारी मा. डॉ. सुचिता पाटेकर, साहित्यिक तथा पूर्व मा. शिक्षणाधिकारी पोपटराव काळे, किनो एज्युकेशन सोसायटीचे मा. रईस शेख, एस.सी.ई.आर.टी.चे मा. अनिल जाधव, तत्कालीन प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब यांनी जाहीर केलेले पहिले बालरक्षक जगदीश कुडे, नूतन मघाडे, सचिन वावरकर, योगिनी वैदू, प्रसेनजित गायकवाड, लहू बोराटे, रामराव पवार यांचे सह राज्यभरातून आलेले बालरक्षक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत काळे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले तर विनोद राठोड यांनी मान्यवरांचे आभार मानले.
.jpg)

Post a Comment
0 Comments