Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आला मौसम आंब्याचा: शुभांगी पासेबंद

 

                    ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख 

आंबा आवडत नाही असे कोणी नसते. पाऊस धारेला जमिनीवर कोसळताना , डासाला त्वचेत सोंड खुपसताना, हत्तीला सोंडेतून ऊस तोंडात टाकताना,सशाला गाजरात दोन दात रुतवताना आणि वाघाला कोणाची मानगुट धरताना  काय आनंद होत असेल, तसा आनंद आंबा खाताना होतो असं माझा एक परिचित म्हणतो.......

तुम आये तो यु लगता है आया मौसम दोस्ती का !

असं आंबा बघितला की कळते ,आया मौसम स्वाद का !

आंब्याच्या स्वादाची सर कशालाच येणे शक्यच नाही. आंब्याला माझ्या माहेरी सुवर्णफळ म्हणायचे.सोन्या बद्दल आणि फळा बद्दल आकर्षण माणसाला कायमच असतं. मग सुवर्ण फळाबद्दल किती असेल विचार करा. जीवनभर माणूस सुवर्णयुगाची आणि केलेल्या कर्माच्या चांगल्या फळाची वाट बघत असतो. तर हे सुवर्ण आणि फळ एकत्र कधी मिळतो  तर मे महिन्यात!

सुवर्ण फळ या निबंधाचे नावावरूनच ओळखलं असेल ,की मी कशाबद्दल लिहिणार आहे.सुवर्ण फळ म्हणजे आंबा होय.आंब्याचा सोनेरी पिवळा धम्मक रंग माणसाला आकर्षित करतो.

‘सोनेपे सुगंध’ म्हणतात तसं सोनेरी रंगासोबत, आंब्याचा तो गोडसर मधूर सुगंध भूक वाढवतो. जीभ चाळवतो आणि त्याचा आस्वाद त्याच्याबद्दल तर काय म्हणायचे.अहाहा,वा वा वा वा!

 तर मी आज आंब्याला सुवर्णफळ अस म्हणणार आहे. मला आठवतं 10जुन 1988 बहिणीचा वाढदिवस होता आणि तिला बक्षीस म्हणून काय द्यायचं म्हणून मेव्हणे विचार करत होते .त्यावेळी एकशे दहा रुपयाला एक अशी हापूसची कलमे विकत मिळत होती. मेहुण्यांनी ती चार आंब्याची रोप बहिणीला वाढदिवसाला बक्षीस म्हणून दिली आणि बागेत लावली.नवल म्हणजेही वरची कथा 1988 सालची साताऱ्याची आहे आणि त्याच दरम्यान आम्ही अलिबागला एका नातेवाईकांच्या बंगल्यात सुद्धा आंब्याची झाडे लावली.आज छत्तीस वर्ष झाली ती आंब्याची झाडं मोठी झाली आहे आहेत आणि सुवर्ण फळांनी बहरली आहेत.


 या काळात माणसांच्या जीवनात चढ-उतार होतात, तसेच त्या झाडांचे सुद्धा जीवनात चढ-उतार झाले. रस्ता मोठा करण्याच्या वेळी आंबे काढून टाका, असं कोणी मागे लागलं .नंतर एकदा आंब्यांना भुंगा लागला आणि कीड लागल्यामुळे झाडं मरू लागली .नंतर मध्ये झाडांना वाळवी लागली .पण या बहिणीने,निसर्ग प्रेमी कुटुंबाने सर्वावर औषधोपचार वगैरे सर्व करून ही झाडं अजूनही जगवली आहेत .रस्त्यावरून जाणाऱ्या वाटसरू ची नजर या झाडांवर ठरेल इतकी सुंदर,डेरेदार,मुठीत मावणार नाही अशा आकाराच्या फळांनी लगडली आहेत. आंब्याला फळांचा राजा असं म्हटलं जातं आणि हापूस आंबा तर काय त्याच्या डोक्यावर एक लोकप्रियतेचा मुकुट सोबत घेऊन येतो. 

दर वर्षी शिवरात्रीला आंब्याचा मोहोर येण्यापासून, ते जुलैमध्ये पाऊस पडल्यानंतर शेवटचा एखादा वरचा कुठलातरी आंबा पडेपर्यंत आम्ही त्या आंब्याच्या झाडाच्या प्रगतीला मन भरून निरखतो. प्रगतीला फॉलो किंवा ट्रोल करत असत असतो .

 मुंबईत काय अंगण सुद्धा नसतं ,पार्किंग सुद्धा नसते. त्यामुळे झाडे लावण्याचे विसरुनच जायचं. ह्या दोन्ही आंबे वृक्ष डेरेदार यांना, जवळजवळ सातशे आंबे येत आहेत. 

मला आठवतं खूप वर्षांपूर्वी कै यशवंतराव चव्हाण यांच आमच्या कॉलेजमध्ये भाषण झालं होतं. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की, “अंगणात आंब्याचं झाड असावं कारण की आंब्याच्या झाडामुळे, तुम्ही राहता तिथे येणाऱ्या वायुमुळे हवा शुद्ध स्वच्छ आणि आरोग्यदायी बनते."

 आमची आई म्हणायची की आंब्याच्या झाडाच्या लाकडाची विळी घरात वापरावी .आंब्याच्या झाडाच्या लाकडाचा पोळपाट वापरा.आंब्याचे लाकडाचा देव्हारा देवाला सुद्धा आवडतो.शुभ असतो. म्हणजे एकूणच काय आंबाराव हे कायम शुभशकुनी असतात.आपल्या कुंकवाच्या कुईरीचा आकार आंब्यासारखा असतो. लग्नात हातावर लावली जाणारी मेहंदी मध्ये सुद्धा कोइरी चा आकार काढला जातो .

आंब्याचे भाव चढेच आहेत .एकशे दहा रुपयाला झाड विकत मिळालं ते आज 36 वर्षे झालीत,आपण एकशे दहा रुपयाला एक आंबा मिळेल इतक्या महागाई पर्यंतची प्रगती 36 वर्षात बघितली आहे. पण आपल्या बागेतील आंब्याच्या वृक्षाची फळे खाणे याचा आनंद निराळा असतो .

आंब्याचे पण किती प्रकार असतात. हापूस ,पायरी ,केशर, तोतापुरी, रायवळ हापूस, शेंदरी राजापुरी हापूस, रत्नागिरी हापूस, जुन्नर हापूस,गावठी आंबे यातलं कुठलंही झाड लावा पण ते तुम्हाला आनंद देते. पूजेसाठी ,कलशासाठी आंब्याची पाने वापरतात.आधी बाळ कैर्‍या,आंबोशी,चटणी, छुंदा, पन्हं यासाठी आणि पुढे लोणच्यासाठी कैऱ्या वापरतात. पुढे साखर आंब्यासाठी कैऱ्या वापरून ,गोड साठवण करून वर्षाची बेगमी होते. पुढे आमरस पण साठवून ठेवतात.पिकलेले आंब्याचा आम रसाचा साखर घालून आठवलेला साठा किंवा मॅंगो जाम या सर्व रुपाने वर्षभर आपण या अमृत फळाचा आनंद घेत असतो. 

आज हे एवढे सांगते कारण की ऑक्सिजन विकत घ्यायचे दिवस करोना आले होते .माणसाने इंच इंच लढवू करून ,इंच इंच विकून जमीन शिल्लक ठेवली नाही आणि झाडे लावणार कुठे हा प्रश्न वाढतच होता.आता तर ती कशी लावायची आणि लावली तर ती जगवणार कोण? अशी परिस्थिती आहे. सोसायटीत तर गॅलरीत देखील कुंड्या ठेवू नये अशी नियमावली मांडण्यात येते .त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी ,आपण प्रत्येकाने, आपल्या दाराशी एक तरी आंब्याचं झाड जरूर लावाव. आंब्याचा सर्व आनंद तुम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहील.हवा शुद्ध राहिल.

 आता मला राहवत नाहीये. बाजाऱातून 1800 रुपये डझन भावाने आणलेल्या पार्सल मधला आंबा मला बोलावतो आहे. ते अमृत सुवर्ण फळ खायला मी आतुर झाले आहे.

आता महिनाभर आमरस पोळी खायची .लाडका असा हाच तर मेनू असतो.

म्हणून सांगते की,आला मोसम आंब्याचा!


**

Post a Comment

0 Comments