Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आपला कुंभारवाडा

                       ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर 

साधारण दक्षिणोत्तर विभागलेला, पूर्वेला भर रस्त्यात " नागेश्वर गोल मंदिर"(गोल देऊळ )सभोवती , संतोषी माता मंदिर , राधाकृष्ण मंदिर  , संत सेना महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि  प्रत्येक गल्लीत प्रभू श्रीरामांच्या बरोबरीने हनुमानाच मंदिर व भर चौकात " माता दुर्गादेवी मंदिर" अश्या या धार्मिक वातावरणात आणि देव  - देवताच्या छत्रछायेखाली दक्षिण - उत्तर , पूर्व - पश्चिम साधारणतः एकवीस एकर  मध्ये वसलेला एक ते सहा गल्ल्यांचा आपला "कुंभारवाडा". 

पूर्वी येथे मराठी समाजासह गुजराती समाज मोठ्या प्रमाणावर रहात होता त्यांचा कुंभारकामाचा व्यवसाय मोठ्याप्रमाणात असल्यामुळे या संपूर्ण विभागाला " कुंभारवाडा " असे संबोधले जाई तसेच त्या विभागातील प्रत्येक गल्लीला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशी एक ते सहा कुंभारवाडा अशी ओळख दिली गेली. त्या प्रत्येक कुंभारवाड्याची खास अशी वैशिष्ट्य आहेत.

पहिला कुंभारवाडा 

" भंडारी स्ट्रीट / सोनार गल्ली "

कुंभारवाड्याची खरी सुरुवात या गल्लीने होते. एस.व्ही.पी.रोड रस्त्याच्या मधोमध असलेल्या  नागेश्वर मंदिरामुळे दोन भागात विभाजन झाले. उत्तरेला असलेल्या भागात पूर्वी भंडारी समाजाचे वास्तव्य असल्यामुळे त्यास " भंडारी स्ट्रीट " असे म्हटले जाते, तर दक्षिणेला कापड व्यापारांची दुकाने आणि त्यांची वस्ती असल्यामुळे त्याभागास " कापडगल्ली " असे म्हटले जात परंतु कालांतराने कापड व्यापारांची दुकाने सोने - चांदीच्या व्यापाऱ्यानीं विकत घेऊन तेथे मारवाडी समाजाने सोने - चांदीची दुकाने थाटली त्यामुळे सध्या त्या गल्लीला "सोनार गल्ली"(मारवाडी गल्ली )असे म्हटले जाते. तसेच या विभागात जे " दुर्गादेवी उद्यान " वसलेलं आहे अश्या ह्या दुर्गादेवी मातेच मंदिर ही या भंडारी स्ट्रीट च्या उत्तरेकडील दिशेला आहे. शेकडो वर्षे जुने शनि मंदिर, मस्जिद, दर्गा येथे आपलं अस्तित्व टिकवून आहेत.

दुसरा कुंभारवाडा 



हिला भाजीगल्ली, कासारगल्ली व सदर मार्गात असलेले नाभिक समाजाचे " श्री संत सेना महाराज मंदिर " ह्यांच्या नावाने "संत सेना महाराज मार्ग" अशी ही नवी ओळख देण्यात आली आहे. इथे सकाळी सहा वाजल्या पासूनचं आर्थिक व्यवहाराला सुरुवात होते ती रात्री अकरा वाजेपर्यंत सुरूच असते. सकाळी सहा ते आठ स्टीलची भांडी खरेदी - विक्री, त्यांनतर आठ ते एक वाजे पर्यंत भाजीपाला बाजार त्यातच कटलरी, ड्रेस मटेरियल, साडी, ओले कडधान्य आणि मसाल्यांचे स्टॉल अश्या नाना विविध वस्तूचा बाजार एखादी इमरजन्सी वगळता दररोज वर्षभर भरलेला असतो. या गल्लीच्या उत्तरेला असलेल्या "रामा" गल्लीतील होळी तर लक्षणीय!

संपूर्ण जगात व महाराष्ट्रात ज्याचा जय जयकार केला जातो असा नवसाला पावणारा "लालबागचा राजा" आणि डोंगरी, चिंचबंदर, उमरखाडी आणि कुंभारवाड्याचे मानाचे गणपती विसर्जनासाठी याच दुसऱ्या कुंभारवाड्यातून गिरगांव चौपाटीकडे मार्गस्थ होतात त्यावेळची या कुंभारवाड्याची शान तर काही औरच असते. गल्लीतील सार्वजनिक उत्सव मंडळाच्या स्थानिकांच्या कार्यक्रमातून सामान्यातून - असामान्य प्रसिद्धीकडे झेपावलेला मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी अभिनेता सुपरस्टार कै.लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात "लक्षा" आणि अभिनेते रवींद्र बेर्डे हे ही इथलेच.

जगातील जवळ-जवळ सर्वच क्रिकेट विरांच्या स्वाक्षरीचा त्यांच्या  छायाचित्रांच्या संग्रहाची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ लिम्का बुक सतत तीन वेळा दखल घ्यायला लावणारे तसेच महाराष्ट्र शासनाने गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविलेले कै.राजेंद्र बाबूराव नार्वेकर हे दैदिप्यमान व्यक्तिमत्व याच गल्लीतील तसेच १९५५-५६ सालच्या महाराष्ट्र स्वातंत्र लढ्यातील १०५ हुतात्म्यापैकी एक कै.धनाजी गंगाराम नागवेकर हे सुद्धा याचं कुंभारवाड्यातले.


तिसरा कुंभारवाडा

सध्याची डॉ. मित्रसेन माहिमतुरा मार्ग याला पूर्वी भेंडीगल्ली सुद्धा म्हंटले जायचं कारण भेंडीच्या झाडाच्या मातीपासून येथील कुंभार मातीच्या चुली, मातीच्या वस्तू बनवायचे सोरठिया प्रजापती कुंभार ज्ञाती समाज येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास होता त्यांनी बांधलेले राम मंदिर आणि तेथील हॉल हे कुंभारवाडा विभागातील छोटेखानी समारंभाच एकमेव ठिकाण. येथील उत्तरेला एका इंग्रज अधिकारी नॉर्थ ब्रुक याचे नावाने असलेल गार्डन म्हणजेच सध्याचं " दुर्गादेवी उद्यान ". याचं उद्यानातं अजिंक्यतारा क्रिडा मंडळाकडून  पूर्वी महिला व पुरुष गटाचे कब्बड्डीचे सामने भरविले जातं.

तर दक्षिणेला असलेल्या कालापत्थर इमारती खाली कबुतरांना खाण दिल जायचं म्हणून त्याभागाला "कबुतर खाना गल्ली" म्हणून सुद्धा सबोधले जायचं तसेच तेथील विश्राम बिल्डींग खाली असलेला श्री विठ्ठलदास विश्राम यांचा तबेला आणि त्यांच्या कडील घोडागाड्या मधून  कुंभारवाडा आणि आसपासच्या परिसरात होणाऱ्या लग्नसरांई,मुंज तसेच इतर धार्मिक विधीतील मिरवणूकीचा थाट काही औरच असे.

चौथा कुंभारवाडा 

पहिली पठाण स्ट्रीट, नाव वाचून नवल वाटलं ना? 

अगदी बरोबर आहे कारण कुंभारवाड्यातील त्याकाळी असलेल्या गुजराती व्यापारी व उद्योजकांना  आर्थिक मदत करण्याकरिता पूर्वी पठाण लोकांचं वर्चस्व होत. चौथा आणि पाचवा कुंभारवाडा मध्ये काही प्रमाणात पूर्वी पठाणांची लोकवस्ती असल्याने चौथा - पाचवा गल्लीस, पहिली पठाण स्ट्रीट आणि दुसरी पठाण स्ट्रीट असे सबोधले जाई. या गल्लीत असलेल्या प्राचीन राम मारुती मंदिरामुळे काही वर्षांपूर्वी या गल्लीला "श्रीराम मारुती मंदिर लेन " असे नामकरण करण्यात आले. त्याकाळी ज्या सिनेमागृहात  सिल्वर आणि गोल्डन ज्यूबली साजरे झालेले  सिनेमागृहाने "मोती सिनेमा"( टॉकीज ) मल्टी फ्लॅक्स मॉल ची वाट पहात आहे. 

पाचवा कुंभारवाडा 

ब्रिटीश काळात येथे पठाणांचे वास्तव असल्यामुळे ह्या गल्लीचा २ री पठाण स्ट्रीट असा नाव लौकीक होता व गल्लीच्या क्रमांका-मुळे ह्या गल्लीला ५ वा कुंभारवाडा असे प्रचलित नामांतर झाले आणि सध्या ह्या गल्लीचे मुंबई महानगर पालिकेच्या दफ्तरी नोंद  असलेली एका पाषाणात कोरलेली सहा फुटी उभी पुरातन मारुतीची मुर्ती असलेले सुर्यवंशी समाजाचे मंदिर असल्यामुळे सर्वांनुमते ह्या गल्लीची  "वीर मारुती मार्ग "अशी फेरनोंद करण्यात आली. पोहा मशिन्स, पिठाची चक्की , तेलाचा घाणा  व मसाल्याच्या मशिन्स बनविणारी महाराष्ट्रातील त्यावेळची  नावलौकीक अशी "नवगिरे आणि कंपनी"आणि मुंबईतील नामाकित गिरण्यांना लागणारे टुल्स आणि डाय येथे असणारया फाउंड्री मधुन तयार होत असत व येथील जे एन जेठवा एन्ड सन्स कपंनी कडून पुरवठा केल्या जात परंतु कालांतराने गिरण्याही बंद झाल्या आणि इथल्या फाउंड्र्याही, सध्या त्यांची जागा  लोखंड आणि स्टीलच्या व्यापारानी घेतल्या.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी छंद म्हणुन गणपती मुर्ती बनविण्यास सुरुवात केलेला आणि  महाराष्ट्र  राज्याचे माननिय राज्यपाल श्री.विद्यासागर राव ह्यांच्या हस्ते दक्षिण मुंबईतील सर्वोत्कृष्ट गणेश मुर्तीकार असा पुरस्कार मिळालेले मुर्तीकार श्री.सुदेश कदम ह्याचे वास्तव ही ह्याच गल्लीत आहे. साधारणता ६० /६५  वर्षे जुना  डॉक्टर मधुसुदन पुजारी ह्यांचा  मुळव्याध, फिशर व भगेंद्र ह्यावर खात्रीशीर कायम स्वरुपी बरे करणार  असा वैद्यकिय दवाखाना अजुन ही तोच लौकीक कायम टीकून आहे. मुंबईतील पुरुष गटात नावाजलेला "जॉली कब्बड्डी संघ" ह्याच कुंभारवाड्यातला.

सहावा कुंभारवाडा 

कुंभारवाड्यातल्या सहा गल्यांपैकी ६ वा आणि शेवटचा कुंभारवाडा. ही गल्ली एस व्ही रोड ला एका समांतर रेषेत मौलाना शौकत अली रोडला जोडली गेली आहे त्यामधूनच  एक दुभाजक अशी खारवा लोकांच्या नावाने ओळखली जाणारी " खारवा गल्ली " असुन ती सरळ पठ्टे बापुराव मार्ग ह्या रस्त्याला  बाहेर निघते. तेथे गिरण्यांच्या मशिन्सचे व जुन्या तोड्लेल्या जहाजांचे सुट्टे भंगार सामान अजुनही  विकले जाते. 

या कुंभारवाड्यात श्री. त्रंबक परशुराम नावाचे समाजसेवक ह्यांचे वास्तव होते त्यामुळे ह्या गल्लीची " त्रंबक परशुराम मार्ग " अशी मुंबई महानगर पालिकेच्या दफ्तरी नोंद आहे. तरीही "सहावा कुंभारवाडा" ही प्रचलित ओळख कायम आहे. येथे मुस्लिम बहुवस्ती असलेल्या काही इमारती असुन त्यात इतर भाषिक ही गुण्या गोविंदाने रहात आहे. येथील रहिवाशी पुसाळकर, हिंदळेकर कुटुंबियानी स्थापन केलेला "साईनाथ स्पोर्ट्स क्लब" हा अजुनही विभागात अग्रगण्य आहे. 

येथे सार्वजनिक गणेशोत्सवाप्रमाणे रमझान ईद , बकरी ईद आणि मोहरम सणामध्ये हिंदु - मुस्लिम ऐक्य दिसुन येते. येथे १००  ते १२५ वर्ष जुने स्वयंभू पंचमुखी महादेवलिंग मंदिर आणि पिंपळाचे झाड अजूनही अस्तित्वात आहे. 

कपड्यांच्या गिरण्यामधील यंत्रमागाचे व भारतीय रेल्वेला लागणारे छोटे - मोठे पार्ट (भाग) बनविण्याचे काम आणि खास करुन १९७२ सालच्या भारत - पाकिस्तान युद्धा दरम्यान युद्धावर निघालेल्या विक्रांत नौकेला रवाना होण्यापुर्वी इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने ते चालु होण्यास लागणारया भागाचे (पार्ट्स) दुरुस्तीचे तातडीचे काम मेसर्स. आर. एन. पाडळकर एंड सन्स ह्यांच्या मिलींग आणि टर्नर - फिटर च्या कारखान्यात यशस्वीरित्या करण्यात आले त्यानंतर ती नौका युद्धासाठी रवाना झाली त्याबद्द्ल भारतीय नौदलाकडून  पाडळ्कर बंधुना  गौरवण्यात आले. पुर्वी परदेशात मिळणारया छोट्या - मोठ्या वस्तु ह्या कुभारवाड्यातील कुशल, हुशार आणि मेहनती  कारागिरांकडुन मराठी म्हणी प्रमाणे " पिन से पियानो तक " अगदी हुबेहुब तयार करण्यात येत . त्यामुळे या पाचव्या कुंभारवाड्याचा "मिनी जपान" असा नावलौकीक होता. येथील अरविंद मंदा ह्यांच्या सुबक आणि आकर्षक अशा मेट्ल  फेर्ब्रिकेशन व इंटरिअर डिझाईनच्या कामामुळे मोठ मोठे व्यापारी तसेच सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्यांकडे आपल्या कामाच्या आगाउ ऑडर नोंदवत असत. येथे लोखंडाच्या कास्टींग - बफिंगचे कारखाने,फाउंड्रा व भट्ट्या बरयाच प्रमाणात होत्या परंतु कालांतराने मिल्स बंद झाल्या आणि धंद्यातील मंदीमुळे तसेच  कामगारांची थकबाकी देण्यासाठी येथील बरेचसे कारखाने बंद पडले तर काहीनी आपल्या जागा विकून गेल्याने सध्या इथे ही  लोखंड व स्टील मार्केट नावारुपाला आले आहे.

आज गेले ते दिवस आणि उरल्यात फक्त आठवणी!!

संजय लिमकर - पत्रकार 

९९३०७३३१०९

E-mail : limkarsanjay@gmail.com

Tags

Post a Comment

0 Comments