जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधकांचा स्वतः काढलेल्या अधिसूचनेचा विसर
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
ठाणे जिल्हयातील महत्वाच्या असलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कालावधी सन २०२४ रोजीच संपुष्टात आला होता. मात्र त्यांनतर आलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी राज्याच्या पणन विभागाने संचालक मंडळाला सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ देऊन तब्बल १ वर्षाचा कालावधी विद्यमान संचालकांनी आपल्या पदरी पाडून घेतला.
या वाढीव मुदतीचा कालावधी २१ एप्रिल २०२५ रोजी संपुष्टात येणार असल्याने, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिसूचना काढून संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. तसेच हरकती, सूचनांवर निर्णय घेऊन त्यांनीच काढलेल्या अधिसूचनेनुसार २५ मार्च २०२५ रोजी अंतरिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता एप्रिल महिना उजाडला तरी अंतरिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन, निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र आत्ता निवडणूक बाबतच्या हालचाली मंदावल्याने शेतकरी, व्यापारी व माथाडी आदी घटकांनी पणन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेबाबत उलट सुलट चर्चा सुरू केली आहे.
अनेक वादग्रस्त निर्णय, शेतकरी - व्यापारी व माथाडींच्या समस्या, वादग्रस्त नोकर भरती आदी प्रकारामुळे कायम चर्चेत राहिलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वीच सहा महिन्यांची दोनदा मुदतवाढ मिळाल्याने विद्यमान संचालक मंडळाचा कालावधी २१ एप्रिल २०२५ रोजी संपुष्टात येणार आहे. याच धर्तीवर जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांनी २७ फेब्रुवारी २०२५ रोजी अधिसूचना काढून संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली.
याच दरम्यान राजकीय अट्टाहासापोटी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकची प्रक्रिया सुरू झाली असताना, अगदी ३ महिन्यांच्या कालावधीसाठी सभापती व उपसभापती निवडणूक प्रक्रिया पार पाडून सभापती पदी दत्ता गायकवाड व उपसभापती पदी गजानन पाटील विराजमान झाले. या सर्व प्रक्रिया पूर्ण होत असताना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार २५ मार्च २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे क्रमप्राप्त होते.
मात्र आपल्याच अधिसूचनेचा विसर जिल्हा प्रशासनाला पडल्याचे दिसून येत आहे. कारण अद्याप अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली नसल्याने व निवडणूक कार्यक्रम जाहीर न केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहे.
दरम्यान वाढीव मुदत वाढीच्या कालावधीत विद्यमान संचालक मंडळाला कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याने बाजार समितीच्या कारभारावर परिणाम झाला आहे. पावसाळ्यापूर्वीचे कामे, बाजार आवरतील अनेक अडचणी, रस्ते व भाजीपाला विभागातील माल उतरवण्यासाठी बनविण्यात आलेल्या धक्क्यांची दुरुवस्था अशा अनेक कारणांमुळे पुढील काळात शेतकरी, व्यापारी व माथाडी आदी घटकांना सेवासुविधांसाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनाने तात्काळ शेतकरी, व्यापारी व माथाडी आदी घटकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
एकीकडे संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतांना विद्यमान सभापती दत्ता गायकवाड यांनी 7 तारखेला विद्यमान संचालकांची बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तर याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे यांना विचारले असता कृषी उत्पन्न बाजार समिती मतदार यादयांमध्ये त्रुटी आढळल्याने फेर सादर करण्यास सांगितले असून दोन तीन दिवसांत अंतिम मतदार याद्या तयार होतील. त्यानंतर साधारण 15 दिवसांत कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल असे सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments