भाजपची ताकद वाढण्यासह पक्ष संघटना आणखी बळकट होणार -
माजी आमदार नरेंद्र पवार
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
संघटन पर्व अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल 1 हजार 200 हून अधिक मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण केल्या आहेत. त्यापैकी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातही 5 नव्या मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या या मंडल अध्यक्षांमुळे भाजपची ताकद आणखी वाढण्यासह पक्ष संघटनाही आणखी मजबूत झाल्याचा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे.
भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत प्राथमिक आणि सक्रीय सदस्य नोंदणीला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात प्रदेश भाजपकडून तब्बल १ हजार २२१ मंडल गठीत करण्यात आली असून त्यापैकी ९६३ मंडलांची रचना जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या १ हजार २२१ मंडलांपैकी २५८ मंडले ही नव्याने स्थापन करण्यात आली आहेत. त्यामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचाही समावेश असून याठिकाणी 3 नव्या मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्याने हा आकडा आता 5 वर गेला आहे.
त्यामध्ये जुने कल्याण शहर मंडल अध्यक्षपदी अमित धाक्रस, नविन कल्याण शहर मंडल अध्यक्षपदी स्वप्निल काटे, मध्य कल्याण शहर मंडल अध्यक्षपदी रितेश फडके, टिटवाळा मंडल अध्यक्षपदी शक्तिवान भोईर आणि मोहने मंडल अध्यक्षपदी नवनाथ पाटील अशा युवा पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या कल्याण पश्चिमेतील विविध कार्यालयांमध्ये या सर्व नियुक्त्या संपन्न झाल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. आता अधिक लोकांपर्यंत, सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद साधला जाणार असून खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाची अंत्योदयाच्या मार्गावर वाटचाल सुरू आहे. तसेच राज्यातील इतर सर्व मंडळ अध्यक्षांप्रमाणे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील या 5 ही मंडळ अध्यक्षांमध्ये "राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" ही भाजपची विचारधारा नसानसात भिनली असल्याचेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह निवडणूक प्रक्रिया प्रमुख डॉ. चंद्रशेखर तांबडे, राजेंद्र वारे, सुभाष म्हस्के, जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments