ब्लॅक अँड व्हाईट उल्हासनगर, प्रतिनिधी
धूळवडीच्या उत्साहात मद्यधुंद अवस्थेत आलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातच गोंधळ घालत सुरक्षारक्षक आणि पोलिसांना धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून, या घटनेने रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
धूळवड खेळल्यानंतर अपघात आणि मारामाऱ्या होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरात किरकोळ अपघात झालेल्या अनेक जखमींना उपचारासाठी मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात आणले गेले. मात्र जखमींसोबत आलेल्या काही नातेवाईकांनी दारूच्या नशेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याने उपचार प्रक्रियेत अडथळा निर्माण होत होता. सुरक्षारक्षकांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही जणांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र यावर काही व्यक्तींनी आक्षेप घेत पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. पाहता पाहता वाद विकोपाला गेला आणि दोन जणांनी सुरक्षारक्षकासह पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेचा व्हिडीओ तेथील एका सुरक्षारक्षकाने आपल्या मोबाईल कैमेऱ्यात कैद केला आहे. यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा अभाव आणि मद्यधुंद नातेवाईकांनी केलेला गोंधळ यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. उल्हासनगर शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षेसाठी अधिक पोलीस तैनात करण्याचा विचार प्रशासन करत आहे. या घटनेनंतर शहरातील नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे. प्रशासनाकडून यावर लवकरच ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.
रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न गंभीर
ही घटना म्हणजे रुग्णालयातील सुरक्षेच्या पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक आणि पोलिसांना अशाच प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षेचे कठोर नियम लागू करण्याची मागणी पुढे येत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments