जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा सन्मान करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन
ब्लॅक अँड व्हाईट ,ठाणे वार्ताहर
संपूर्ण देशात 8 मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, उमेद अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी पाणी व स्वच्छतेबाबत गावात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आले आहेत. सर्व ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
त्यानुसार सर्व ग्रामपंचायतीमध्ये अंमलबजावणी सहाय्य संस्था म्हणून निवड झालेले ग्राम संघातील सर्व महिलांची जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष स्वच्छता धाव (वॉश रन) आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये उमेद अंतर्गत बचत गटातील महिला, किशोरवयीन मुली / विद्यार्थीनी, स्वच्छता कर्मचारी, पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि समुदयातील प्रभावशाली लोकांचा समावेश करून पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. सभेत पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित कार्यक्रमांच्या अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीत येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा, कथा कथन सत्र, पथनाट्य, मासिक पाळी व्यवस्थापन, एफटीके (Ftk) किट चाचणी करण्याचे नियोजन सुरू आहे.
ग्रामस्तरावर पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वच्छता कामगार महिला, स्वच्छतेच्या मालमत्तेचे परिचालन, देखभाल व दुरुस्ती संबंधित सुयोग्य व्यवस्थापन करणाऱ्या महिला नेतृत्व, किशोरवयीन चॅम्पियन, क्षेत्रीय तपासणी संचाच्या सहाय्याने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण करणाऱ्या महिलांचा तालुकास्तरावर सत्कार सोहळा आयोजित असल्याबाबतची माहिती पाणी व स्वच्छाता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.
विशेष सत्कार
पाणी व स्वच्छतेचे व्यवस्थापन करणारे स्वयंसेवी गट, नेते, किशोरवयीन चॅम्पियन, पाणी गुणवत्ता बाबत देखभाल दुरुस्त करणाऱ्या महिला (एफटीके किट वापरून) आणि वॉशच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व महिलांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
*असे होणार उपक्रम*
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता धाव (वॉश रन) आयोजन, महिलांचा सन्मान, ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन, जिल्ह्यात किमान एक महिला अनुकूल आदर्श ग्रामपंचायती संबंधित मॉडेलची उभारणी करण्यात येणार आहे. स्थानिक महिला नेतृत्वासोबत गट चर्चा किंवा कथाकथन सत्र, पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रातील महिलांच्या भूमिकेविषयी पथनाट्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन तसेच एफटीके किट चाचणी आणि इतर वॉश संबधी नाविन्यपूर्ण प्रशिक्षण सत्र, तथा स्वयं सहाय्य बचत गटाच्या नेतृत्वाखालील पाणी व स्वच्छता क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रदर्शन करणारे मेळावे आयोजित करण्यावर भर देण्यात येणार आहे.
000
.jpg)

Post a Comment
0 Comments