टास्क फोर्सचीही स्थापना होणार
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
उल्हास नदीत सांडपाण्यामुळे वाढणारी जलपर्णी आणि वालधुनी नदीची प्रदूषणामुळे झालेली वाताहत दूर करण्यासाठी शुक्रवारी राज्याचे नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि महाराष्ट्र प्रदेश नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नवा कृती आराखडा तयार करण्यावर एकमत झाले.
उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यास येत्या १५ दिवसात सुरूवात केली जाणार असून त्यासाठी यंत्रे भाडेतत्वावर घेतली जाणार आहेत. काही तात्काळ आणि काही दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर यावेळी एकमत झाले. येत्या काही दिवसात याची अंमलबजावणी होणार असून नद्यांच्या प्रदूषण मुक्तीसाठी सर्व पालिका, प्रदुषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार संयुक्तरित्या काम करणार असल्याचेही यावेळी ठरवण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीतील जलपर्णीचा विषय गंभीर झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जलपर्णीला हटवण्यासाठी आंदोलनेही सुरू आहेत. याची गंभीर दखल घेत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जलपर्णी काढणे, उल्हास नदी आणि वालधुनी नदी प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, यासाठी काही तात्काळ उपाययोजना आणि काही दिर्घकालीन योजना राबवण्यावर यावेळी एकमत झाले. एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीनंतर उल्हास आणि वालधुनी नदी प्रदुषणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निरी संस्थेला कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. या आराखड्यात गरजेनुसार बदल करण्यासाठी नदी वाहत असलेल्या पालिकांनी एकत्रितपणे सांडपाण्याचे स्त्रोत तपासून ते जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणापर्यंत नेण्यात यावेत, अशा सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केल्या.
.jpg)

Post a Comment
0 Comments