ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या विविध प्रभागात आज दिवसभरात थकबाकी पोटी अनेक मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई करण्यात आली.
मालमत्ता कर निर्धारण व संकलन विभागाच्या उपआयुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी यांनी समक्ष पाहणी करुन, त्यांच्या उपस्थितीत अ प्रभागातील सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी रु. 37 लाख 93 हजार 893 इतक्या थकबाकी पोटी एस.बी.आय. बँकेचे एटीएम सील करण्याची कारवाई केली. तसेच नांदप रोड टिटवाळा येथील जी.आर.पाटील या शाळेच्या रु. 1 कोटी 29 लाख 75 हजार 685 इतक्या थकबाकी पोटी शाळेची 2 कार्यालये सील करण्याची कारवाई केली.
जे प्रभागात सहा.आयुक्त सचिन तामखेडे यांनी शक्तीधाम येथील विकासकाचे ऑफीस रु. 93 लाख 63 हजार 847 इतक्या थकबाकी पोटी सील करण्याची कारवाई केली. तसेच के.एस.ए. विकासक यांच्या रु. 3 लाख 32 हजार 651 इतक्या थकबाकी पोटी मालमत्ता क्र. B02002417600 सील करण्याची कारवाई केली.
ह प्रभागात सहा.आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली (पश्चिम) महाराष्ट्र नगर येथील विकासक किरतकर यांच्या रु. 35 लाख इतक्या थकबाकी पोटी ऑफीस सील करण्याची कारवाई केली. तसेच व्होरा हाईटस् मधील मालमत्ता क्र. H12023294900 हे रु.29 हजार 237 इतक्या थकबाकी पोटी सील करण्यात आली. तर आय प्रभागात सहा.आयुक्त भारत पवार यांनी मलंग रोड येथील इसार पेट्रोल पंप रु. 3 लाख 15 हजार इतक्या थकबाकी पोटी सील करण्याची कारवाई केली .
.jpg)

Post a Comment
0 Comments