म्हसोबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज
ब्लॅक अँड व्हाईट (मुरबाड) दिलीप पवार
संपूर्ण महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असणारी मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेची लगबग सुरू झाली असून प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. नवसाला पावणारे देवस्थान म्हणून खांबलिंगेश्वर म्हसोबा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे हे मानाचे श्रद्धास्थान आहे. म्हसा यात्रेच्या पार्श्वभूमीवर म्हसा ग्रामपंचायत, खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट, तहसील प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक आमदार किसन कथोरे यांच्या वतीने घेण्यात आला आहे.पौष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्याला वेध लागतात म्हसा यात्रेचे. म्हसा हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाडपासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात म्हसोबाचे (भगवान शंकराचे) प्राचीन मंदीर आहे, या मंदीरावरून गावास म्हसा हे नाव पडले. या पंचक्रोशीतील भाविक म्हसोबा आणि खामलिंगेश्वराच्या दर्शनाला येतात. या यात्रेला दोनशे वर्षा पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे ३ ते ४ किलोमीटर परिसरामध्ये ही यात्रा भरते. या यात्रेत फक्त राज्यातून नव्हे तर इतर राज्यातूनही लाखो भाविक हजेरी लावतात.
लाखों रुपयांची उलाढाल
जवळपास १० ते १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजेच यात्रेत भरणारा बैलांचा बाजार. अनेक जनावरं या यात्रेत विक्रीसाठी आणली जातात. बैलाची जात रंग आणि वयानुसार त्यांच्या किमती ठरतात गुलाल उधळून बैलांचा व्यवहार होतो. पंधरा दिवसात या बैलांची उलाढाल एक कोटीहून जास्त रुपयांची होते . या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला टोपली बाजार. बांबूच्या टोपली बनवणारे आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात. या बाजारात टोपल्यांची मोठी उलाढाल होते. लहान मोठ्या आकारांच्या टोपल्या, करंडे येथे मिळतात. तसेच उखळ शेतीसाठी लागणारी अवजारे आणि घरगुती वापराच्या वस्तू या बाजारात मिळतात. मेंढीच्या लोकरी पासून बनवलेल्या अस्सल घोंगड्या हे या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. विणलेल्या आणि लाटीव अशा दोन प्रकारच्या घोंगड्या येथे मिळतात. करमणुकीचे खेळ, आकाश पाळणे, खाऊ खेळणी चे दुकानं यांची रेलचेल येथे असते. म्हसा यात्रेत हातोली, खाजे ,गुलाबजामुन फार फेमस आहेत .दूरवरून ही मिठाई घेण्यासाठी लोक बाजारात येतात. रात्रीही या यात्रेची रंगत काही औरच असते काही लोक यात्रेला मुक्कामी येतात. तंबू ठोकून राहतात आणि यात्रेतच चुल करून जेवून जातात. शहरी गजबजाटापासून दूर भरणाऱ्या या यात्रेत एक वेगळाच आनंद मिळतो.
म्हसा ग्रामपंचायत प्रशासन सज्ज
१३ जानेवारी २०२५ पासून सुरू होत असलेल्या या यात्रे साठी म्हसा पंचायतीने जय्यत तयारी केली आहे. येणाऱ्या सर्व भाविकां साठी पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी व्यवस्था. लाईटची सुविधा , संपुर्ण यात्रा परीसरात १६ C.C.T.V. कॅमेरे बसवले जाणात आहेत. १० ठिकाणी फिरते प्रसाधनगृहे बसवले जाणार आहेत. यात्रेत स्वच्छते वर विशेष भर देण्यात आला आहे. दररोज औषध फवारणी, डास धुराची फवारणी केली जाणार आहे. सतत ओलसर असणाऱ्या जागेवर TCL पावडर टाकण्यात येणार आहे. यात्रेत जवळपास १५० L E D व १५० मोठे इलेक्ट्रिक दीवे लावण्यात येत आहेत. रोज साफ सफाई केली जाणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात पोलीस स्टेशन उभारण्यात आले आहे. रोज कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घंटा गाडी लावन्यात येणार आहे.
आपत्कालीन आगीवर नियंत्रण मिळवण्या साठी अग्नीशमन दलाचे बंब रोज तैनात असतील. भाविकांच्या आरोग्याची ही विशेष काळजी घेण्यात येत आहे. म्हसा उपकेंद्रात विशेष कक्ष उभारण्यात आला नाही. येथे २४ तास रोज डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत.
.jpg)


Post a Comment
0 Comments