Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मध्यरात्री उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहातून आठ मुलींचे पलायन

 

पोलिसांची तातडीची कारवाई 

पोलिसांच्या शोधमोहिमेत सात ताब्यात, एक अद्याप फरार

           ब्लॅक अँड व्हाईट( उल्हासनगर ) प्रफुल केदारे
उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ५ येथील शासकीय निरीक्षण गृहातून बुधवारी मध्यरात्री तब्बल आठ अल्पवयीन मुलींनी खिडकीच्या लोखंडी जाळ्या तोडून पलायन केल्याने खळबळ उडाली. या घटनांनी प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विशेष म्हणजे, पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिललाईन पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून सात मुलींना उल्हासनगर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. मात्र एक १७ वर्षीय मुलगी अद्याप फरार असून तिच्या शोधासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.

मुलींच्या रात्रीच्या पलायनाची घटना शासकीय निरीक्षण गृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. बुधवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास आठ अल्पवयीन मुलींनी लोखंडी जाळ्या तोडून पलायन केले. १५ ते १७ वयोगटातील या मुली निरीक्षण गृहाच्या शय्यागृहातून बाहेर पडल्या. कर्मचाऱ्यांना रात्री टेहाळणी करताना मुलींची अनुपस्थिती आणि जाळ्यांची तुटलेली अवस्था पाहून शासकीय निरीक्षण गृहाच्या वरिष्ठांना आणि पोलिसांना याची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्काळ शोधमोहीम राबवली. उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकांवर शोध घेत असताना, लोकल सेवा बंद असल्याने या सात मुली उल्हासनगर रेल्वे स्थानकावरच सापडल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पुन्हा निरीक्षण गृहात दाखल केले. मात्र, एक मुलगी अद्याप फरार असून तिचा शोध घेतला जात आहे. या प्रकारामुळे निरीक्षण गृहातील सुरक्षा व्यवस्थेची त्रुटी समोर आली आहे. पूर्वीही अशा घटना घडल्या असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेने प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हिललाईन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात मुलींना सुरक्षित परत आणण्यात आले असून, फरार मुलीचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनेच्या कारणांची सखोल चौकशी सुरू केली असून, निरीक्षण गृहातील सुरक्षा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर नागरिकांमधून सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शासकीय निरीक्षण गृहांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि सतर्कता ठेवणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments