Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

४०० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीवर

 

४०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, २८ तारखेला शाळेवर कारवाई होणार

            ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण पूर्वला वालधुनी परिसरात एका शाळेला रेल्वे प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. २८ जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करा असा आदेश रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

या आदेशाला शिक्षक, पालक यांच्यासह विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवला आहे. ही शाळा रेल्वेच्या जागेवर आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन शाळेवर कारवाई करत आहे.

कल्याण पूर्व वालधुनी परिसरात रेल्वे हॉस्पिटल समोरच्या रेल्वेच्या जागेत सोशल वेल्फेअर इंग्लिश स्कूल अशी शाळा आहे. सहा महिन्यांपूर्वी रेल्वेने शाळेला नोटीस पाठवत शाळा बेकायदेशीर आहे असे सांगून ती रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. आज (२१ जानेवारी) रेल्वेचे अधिकारी पोलीस फौजफाट्यासह शाळेवर कारवाई करण्यासाठी दाखल झाले. या कारवाईला शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी विरोध दर्शवला आहे.

शाळेचे संचालक ज्ञानेश्वर मराठे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ही शाळा १९६८ पासून या जागेवर आहे. रेल्वेने पाठवलेल्या नोटीसमध्ये पंधरा दिवसात भाड्याचे २ कोटी ४४ लाख रुपये भरा अन्यथा शाळा खाली करा असे नमूद करण्यात आले आहे. आमच्या संस्थेला इतके पैसे भरणे शक्य नाही.

ज्ञानेश्वर मराठे पुढे म्हणाले, आता दोन महिन्यांवर मुलांच्या परीक्षा आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या पूर्वपरीक्षा सुरु आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात आम्ही कल्याण न्यायालयात धाव घेतली आहे. ही सुनावणी न्यायालयात प्रलंबित आहे. रेल्वेने आम्हाला मुदत द्यावी. कारवाई केल्यास विद्यार्थ्यांचेे शैक्षणिक भवितव्य अंधारात जाईल.

कल्याणमधील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनीही रेल्वेच्या कारवाईचा विरोध केला आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र या शाळेत ४०० विद्यार्थी शिकत आहे. त्यामुळे कारवाई करण्यापूर्वी आधी शाळेला जागी उपलब्ध करुन द्यावी मग ही कारवाई करावी अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments