कल्याणात महायुती अभेद्यच
उमेदवार विश्वनाथ भोईर आणि भाजप
नेते नरेंद्र पवार यांचा एकत्रित प्रचार
भोईर यांच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला
लावणार, नरेंद्र पवार यांचा निर्धार
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती ही अभेद्यच असल्याचे आश्वासक असे चित्र आज दिसले. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइं, लहुजी सेना महायतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या खांद्याला खांदा लावत भाजप नेते तथा माजी आमदार नरेंद्र पवार हे निवडणूक प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले. महायुती ही अभेद्यच असल्याचे सूतोवाच महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले. तर विश्वनाथ भोईर यांच्या विजयासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावू असा निर्धार यावेळी नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी प्रचाराचा धडाका लावला असून आज संध्याकाळी मोहने परिसरात त्यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले आणि नंतर आपली उमेदवारी मागे घेत महायुतीला पाठिंबा देणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभाग घेतला होता.
नरेंद्र पवार यांनी पक्षादेश शिरसावंद्य मानत अर्ज मागे घेऊन एक आदर्श कार्यकर्ता कसा असतो याचा दाखला सर्वांसमोर घालून दिला आहे. आपण याआधीही सांगितले होते की महायुती अभेद्य आणि अभेद्यच राहणार आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपाइं, लहुजी सेनेचे प्रमूख नेते कार्यकर्ते इकडे उपस्थित असून या एकीचा प्रत्यय येत आहे. आम्ही सर्व जण महायुती म्हणूनच एकत्र लढणार आणि जिंकणारही असा ठाम विश्वास उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
तर विश्वनाथ भोईर यांनी आपल्या आमदारकीच्या काळात सगळ्यांनाच मदत होईल असे काम केले आहे. आपल्या पाठीशी असणारी सर्वच्या सर्व मते ही विश्वनाथ भोईर यांच्या पाठीशी उभी करून रेकॉर्ड ब्रेक मतांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा विजय होईल यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही माजी भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.
यावेळी जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, विधानसभा संघटक मयूर पाटील, भाजप मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, अंकुश जोगदंड, अनंता पाटील, समाजसेवक अजय सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी, शेकडो महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)


Post a Comment
0 Comments