Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मतदारांत मतदानाबाबत उदासीनता - नाराजी !

  जनतेच्या  मूलभूत समस्या -प्रश्नांचा आवाज प्रचारात ध्वनित होत नसल्याने मतदारांत मतदानाबाबत उदासीनता - नाराजी !

मुंबई विशेष प्रतिनिधी

     लोकशाही मंदिराचा पाया म्हणजे निवडणुका ! यामुळेच निवडणुकीतील प्रचाराला लोकशाहीत अनन्य साधारण महत्व असते . प्रचारातून प्रत्येक उमेदवाराला , प्रत्येक राजकीय पक्षाला सत्तेत आल्यावर जी जनहिताची ध्येय धोरणे राबवले जाणार आहेत त्याचा आरखडा व त्या आराखड्याच्या अंमलबजावणीचा रोडमॅप ठेवण्याची सुवर्ण संधी प्राप्त होत असते . एकुणातच निवडणुकीतील प्रचार हा लोकशाही व्यवस्थेतील मतदारांच्या आकांक्षाना , स्वप्नांना , समस्यांना न्याय देणारा अभिप्रेत असतो . वास्तवात मात्र लोकशाही व्यवस्थेतील आदर्श प्रचाराचा लवलेशही  वर्तमान प्रचारात दिसत नाही . सामान्य जनतेच्या हितासाठी निवडून द्या , सत्ता द्या अशी दवंडी पिटणाऱ्या  उमेदवारांना , राजकीय पक्षांना सामान्य जनतेच्या समस्या -प्रश्नांशी देणेघेणेच उरलेले नाही  अशी भावना मतदारांची होत असल्याबाबतचे मत मंचाचे सदस्य अरुण कागले यांनी व्यक्त केले .
  नवी मुंबई हे नियोजित शहर असे म्हटले जात असले , येथील महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका असली तरी नवी मुंबईत सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत .  नवी मुंबईतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था , सार्वजनिक शिक्षण व्यवस्था हि लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशी नाही व तिचा दर्जा देखील प्रश्नांकितच आहे . नियोजित शहर असल्याने रस्ते रुंद असले तरी त्यातील  १/३ भाग हा पार्किंग साठी वापरला जात असल्याने व सर्वंकष वाहतूक धोरण व सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याने  वाहतूक कोंडीचा सामना नवी मुंबई करांना वारंवार करावा लागतो आहे . नियोजनशून्य व अनियंत्रित पद्धतीने  इमारतींचा पुनर्विकास होत असल्याने भविष्यात शहराला बकालपणा येण्याचा धोका संभवतो आहे .
    नवी मुंबई कर मतदात्यांसमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे शहराचे नियोजन व गाडा हाकणाऱ्या सिडको आणि पालिकेला लागलेले भ्रष्टाचाराचे ग्रहण . कामासाठी येणाऱ्या नागरिकांची अडवणूक करून आर्थिक लूट याच सूत्राने कारभार चालवला जात असल्याने नागरिकांच्या दृष्टीने या छळवणूक छावण्या झालेल्या आहेत . कुठल्याच पक्षाचा उमेदवार , अपक्ष उमेदवार त्यावर भाष्य करत नसल्याने , पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार निर्मूलन याबाबत आश्वासन देत नसल्याने  लोकप्रतिनिधींचाच भ्रष्टचाराला व नागरिकांच्या छळाला वरदहस्त आहे की  काय ?  "सबका साथ ,सबका विकास " म्हणजे नेते आणि नोकरशाहीने  एकत्र येत करावयाची लूट असे तर नाही ना ? नवी मुंबई महानगरपालिका लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचे आवाहन मतदाराला करताना दिसते आहे त्या पालिकेच्या प्रशासना कडे वारंवार पाठपुरावा करून देखील पालिकेचा कारभार करदात्या नागरिकांसमोर ठेवला जात नाही  अगदी आरटीआयला देखील केराची टोपली दाखवली जाते  त्यामुळे पालिका प्रशासनाला " लोकशाही मान्य  " आहे का ?   अशी शंका सजग नागरिक मंचाचे प्रवर्तक सुधीर दाणी यांनी व्यक्त केली .
    मँग्रोजला इजा पोहचवून , पाणथळी -खाडीवर अतिक्रमण करून , शहराचे फुफुस्स असणाऱ्या पारसिक हिलला हानी पोहचवून  प्रशासकीय व राजकीय वरदहस्ताच्या माध्यमातून होणारे अधिकृत -अनधिकृत बांधकामे व पर्यायाने पर्यावरणाला पोचणारी हानी यामुळे नवी मुंबईत पर्यावरण व प्रदूषणाची समस्या मोठी असून देखील  प्रचारात त्याचे प्रतिंबीब दिसत नाही .  निसर्गाप्रतीची असंवेनशीलता हि नागरिकांच्या व शहराच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचे स्पष्ट मत मंचाचे सदस्य  कपिल कुलकर्णी यांनी व्यक्त केले .
  सभांच्या माध्यमातून मतदारांशी केला जाणारा एकतर्फी संवाद  , रिक्षा -वाहनांवर भोंगे लावून केला जाणारा प्रचार या कालबाह्य मानसिकतेतून बाहेर पडत प्रगल्भ लोकशाहीसाठी  २१ व्या शहरातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी  निवडणूक लढवणाऱ्या सर्वच पक्षीय उमेदवार , अपक्ष उमेदवारांनी मतदारांच्या भावना , प्रश्न , समस्या जाणून घेण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे , संवाद प्लँटफॉर्म निर्माण करणे काळाची गरज आहे  . 
    त्याच बरोबर निवडणूक आयोगाने देखील मतदारांना योग्य उमेदवाराला मत देण्याची संधी प्राप्त व्हावी  , प्रत्येक उमेदवाराची आर्थिक , सामाजिक , शैक्षणीक , उमेदवाराचा अधिकृत व्यवसाय , त्याने आजवर दिलेले सामाजिक योगदान  ,  गुन्हेगारी -गुंडगिरी मुळे दाखल झालेले गुन्हे -केसेस , वर्तमान आमदाराने खर्च केलेल्या निधीचा तपशील , ५ वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा  हा मतदारसमोर येईल यासाठी तातडीने उपाययोजना करायला हव्यात , नव्हे  खऱ्या लोकशाहीच्या स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने अशा प्रकारची पारदर्शकता  निर्माण करण्यासाठी  निवडणूक आयोगाने पाऊले उचलावीत अशी मागणी करणारा ईमेल मंचाच्या वतीने राज्य निवडणूक आयोग व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला असल्याची व सजग नागरिक मंच यासाठी  भविष्यात देखील यासाठी पाठपुरावा सुरु ठेवेल अशी माहिती  मंचाचे सदस्य संजय सोनावणे यांनी दिली . 

With High Regards

ALERT CITIZENS FORUM  

BE THE CHANGE YOU WANT TO BE 

Dream It ! Belive It ! Make it happen!

ALERT CITIZENS ARE THE MAIN PILLAR OF DEMOCRACY


Post a Comment

0 Comments