गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट
भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ९९ उमेदवारांची घोषणा केली. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचा इशारा महेश गायकवाड यांनी दिला होता. आमदार गायकवाड आणि शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष काही नवा नाही. द्वारली येथील एका जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात शहर प्रमुख गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना फेब्रुवारी २०२४ मध्ये घडली. या गोळीबार प्रकरणी आमदार गायकवाड सध्या तळोजा कारागृहात आहेत. आमदार गायकवाड यांना जामीन मिळालेला नाही. त्यामुळे भाजपने आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीला विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे.दरम्यान, मागील काही दिवसांपासून आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्यांना भाजपने विधानसभा प्रमुखपद दिले. आमदार गायकवाड यांच्या अनुपस्थितीत सुलभा गायकवाड यांनी विकास कामांची भूमिपूजने केली. तसेच पक्षाच्या बैठका, विविध कार्यक्रमांसह शहरातील अन्य कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे भाजपकडून सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता होती ज्यावर आज शिक्कामोर्तब झाला. याच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आमदार गायकवाड यांच्या विरोधात दंड थोपटताना तिखट प्रतिक्रिया दिली. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदेंचे विश्वासू मानले जाणारे महेश गायकवाड अपक्ष लढणार का याची चर्चा रंगली आहे.आमदार गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदार संघातून गेली १५ वर्षे आमदार आहेत. त्यांनी गेल्या १५ वर्षात विकास कामे केली नाहीत. शहरात पाणी समस्या, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहतूक कोंडीची समस्या, शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा आमदार गायकवाड यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे शहर प्रमुख गायकवाड यांनी सांगितले होते.
Post a Comment
0 Comments