Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवली, निळजे आणि लोधा हेवनच्या नागरी समस्यांवर भाजप आक्रमक

 

रस्ते, पाणी, वीज आणि वाहतूक प्रश्नांवर तातडीच्या कारवाईची व संयुक्त पाहणीची मागणी

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

लोधा हेवन, निळजे-डोंबिवली पूर्व आणि परिसरातील वाढत्या नागरी समस्यांकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीचे कल्याण जिल्हाध्यक्ष नागेंद्र शर्मा यांनी केडीएमसी आयुक्तांना निवेदन दिले आहे. यावेळी महासचिव सुधाकर तिवारी, कोषाध्यक्ष देवीशंकर शुक्ला, कार्यालय सचिव स्वाति सिंह, सचिव अपर्णा सिंह, भाजपा कार्यकर्ता प्रीति तिवारी आदी उपस्थित होते.
परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वाढीव वीजबिल, अतिक्रमण, मध्यवर्ती पुलाजवळील बाजार आणि वाहतूक कोंडी या प्रश्नांवर तातडीने संयुक्त पाहणी करून वेळबद्ध कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी लवकरात लवकर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून काय काय समस्या आहे ? ह्याची संपूर्ण माहिती घेऊन समस्या सोडवण्याचा काम करणार असल्याचे सांगितले.
परिसरातील अनेक रस्ते खड्डेमय आणि खराब झाले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आपत्कालीन वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ठिकाणी दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि रस्ते रुंदीकरणाची वेळबद्ध योजना आखण्याची मागणी करण्यात आली आहे.

रस्ते आणि सार्वजनिक जागांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी वाहतूक कोंडी, अनियंत्रित पार्किंग आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अतिक्रमणाचे निष्पक्ष सर्वेक्षण करून नियमानुसार सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
दोन मोठ्या निवासी परिसरांना जोडणाऱ्या मध्यवर्ती पुलाजवळ भरणाऱ्या बाजारामुळे अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. बाजार बंद करण्याची मागणी नसून व्यापाऱ्यांच्या उपजीविकेचा विचार करून बाजारासाठी सुरक्षित आणि नियोजित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.
लोधा हेवनमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, अचानक वीज कटऑफ आणि व्होल्टेजमध्ये चढ-उतार होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जुन्या वीजवाहिन्या किंवा विद्युत पायाभूत सुविधांमुळे समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले जात असल्याने परिसरातील वीजवाहिन्या, केबल आणि ट्रान्सफॉर्मरवरील भाराचे तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
परिसरात अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाईपलाईनची क्षमता, पाण्याचा दबाव आणि वितरण व्यवस्थेचा तांत्रिक आढावा घेऊन नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केडीएमसीचे रस्ते विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग, महावितरण, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त स्थळ पाहणी तातडीने आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे

Post a Comment

0 Comments