दोनदा निविदा काढूनही प्रतिसाद नाही
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कल्याण पश्चिमेत आरक्षित भूखंडावर तीन मजली रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) मिळत नसल्याने या रुग्णालयाचे पुढील काम रखडले आहे.
कल्याण पश्चिमेतील आरोग्य विभागासाठी आरक्षित भूखंड क्रमांक २३२ वर केडीएमसीने तीन मजली मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची इमारत उभारली आहे. या रुग्णालयात १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पीएमसी नियुक्त करण्यासाठी दोन वेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
याबाबत मनपा उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी माहिती देताना सांगितले की, पीएमसी नियुक्तीसाठी यापूर्वी दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, दोन्ही निविदांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे.
केडीएमसीच्या आरोग्य सेवांवर यापूर्वीही सातत्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मनपाच्या सभांमध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांकडून आरोग्य सेवा, रुग्णालयांमधील सुविधा आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात. अशा परिस्थितीत १०० बेडचे रुग्णालय उभारूनही पीएमसीअभावी त्याचे काम रखडणे हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा मुद्दा ठरत आहे. आता तिसऱ्यांदा काढण्यात येणाऱ्या निविदेला प्रतिसाद मिळतो का आणि या रुग्णालयाचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना कधी मिळणार, याकडे कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments