Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विनोदी साहित्यिक वि.आ. बुवा जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद कल्याणने आयोजित " स्मरण करुया वि. आ. बुवांचे" कार्यक्रम संपन्न.

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

"आपल्या प्रत्येक भाषणाची सुरवात वि.आ.बुवा एखादा विनोद सांगून करीत असत, बुवांचे समकालीन  असलेल्या भा. ल. महाबळ, द.मा. मिरासदार व वि.आ. बुवा यांनी विनोदाचे सर्व प्रकार आपल्या साहित्यातून हाताळले, आपल्याला सकस साहित्य दिले.  अशा थोर साहित्यिकाच्या जन्म शताब्दीनिमित्ताच्या कार्यक्रमात यायला मिळाले याचा आनंद आहे असे उद्गार महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे शाखेचे अध्यक्ष श्री. चांगदेव काळे यांनी शनिवारी कल्याण येथे काढले ते प्रसिद्ध विनोदी साहित्यिक वि.आ.बुवा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद कल्याण शाखेने आयोजित केलेल्या "स्मरण करुया वि. आ. बुवांचे" या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विनोदी साहित्य म्हणजे काय? याची थोडी चर्चा करुन त्यांनी बुवांच्या आठवणी सांगितल्या. कल्याण शाखेचे अध्यक्ष श्री भिकू बारस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात कल्याण मसापची वाटचाल व बुवांचा परिचय कसा झाला?, त्यांची सायकल, त्यांचा टापटीपपणा या बद्दल आपला अनुभव सांगितला. 

मसापचे कोषाध्यक्ष तसेच बुवांचे स्नेही श्री प्रवीण देशमुख यांनी बुवांच्या जीवन चरित्राचा परिचय करुन देत त्यांचे साहित्य, त्यांची जीवन सूत्रे यांची माहिती रोचकपूर्ण रीतीने सांगितली. बुवांच्या सुविद्य सूनबाई सौ. विशाखा बुवा यांनी "घरातले बुवा" श्रोत्यांसमोर आपल्या बोलण्यातून मूर्तीमंत उभे केले. ते देशस्थांतील कोकणस्थ होते ही त्यांची टिप्पणी विशेष होती. सौ. स्वाती नातू व सौ अनिता कळसकर यांनी बुवांचे विनोदी लेख आकर्षक रित्या सादर करुन श्रोत्यांची मने जिंकून घेतली. उपाध्यक्ष ॲड. सुरेश पटवर्धन, व डाॅ. रत्नाकर फाटक यांनीही बुवांच्या आठवणी सांगितल्या. सौ. सुरेखा गावंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमस्थळी सार्वजनिक वाचनालयाने वि. आ. बुुवांंच्या साहित्याचे प्रदर्शन मांडले होते. त्याचा रसिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन सौ. करुणा कल्याणकर यांनी केले. वि. आ.बुवा यांच्या कुटुंबियांनी जन्मशताब्दीनिमित्त सार्वजनिक वाचनालय व महाराष्ट्र साहित्य परिषदेला प्रत्येकी रु. ५००१/- ची देणगी जाहीर केली. पाऊस असूनही कार्यक्रमास कल्याणकर रसिकांची मोठी उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments