ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
भाजप नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टी, जुने कल्याण शहर मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा हेमलता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शासकीय एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिराला गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिशु विकास शाळेजवळील स्वानंद नगर, शक्ती बेतुरकर चौक येथील जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर पार पडले. महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक तसेच विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली.
या शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तसेच मेट्रो प्रवासासाठी आवश्यक असलेले एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांना शासनाच्या प्रवास सवलत योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शनही करण्यात आले. या शिबिरात १० ते ६५ वर्षे वयोगटातील महिला -मुलींना ५० टक्के प्रवास सवलत, ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत तसेच ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिक (महिला आणि पुरुष) यांना मोफत प्रवास योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक स्मार्ट कार्ड प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली. यासोबतच सदर शिबिरात कल्याण जनता सहकारी बँकेमध्ये महिलांकरिता शून्य बॅलन्स खाते उघडण्याची योजना तसेच उद्योजक महिलांसाठी विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली.
संपूर्ण शिबिरात आधारकार्ड पडताळणी, मोबाईल ओटीपी प्रमाणीकरण आणि अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांनी विशेष मदत केली. भाजप नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार यांनी सांगितले की, "नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजना त्यांच्या दारापर्यंत पोहोचवणे हीच लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा प्रवास लाभ सहज मिळावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हीच माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट ठरल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेविका हेमलता पवार, नगरसेवक शामल गायकर, स्थानिक प्रतिष्ठीत नागरिक प्रभाकर शिंदे, किशोर म्हस्के, समृध्दी देशपांडे, संध्या निकुंभ, अथर्व पांडे, राकेश आंधळे, राहुल शिंदे, स्मिता जोशी, स्नेहल सोपारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
.jpg)


Post a Comment
0 Comments