ब्लॅक अँड व्हाईट मुंबई प्रतिनिधी
मुंबई उपनगरातील वर्सोवा येथील जोसेफ पटेल वाडी, सर्वे क्रमांक ४१ मधील प्रस्तावित एसआरए प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रकल्पासंदर्भात विविध शासकीय कार्यालयांकडे तक्रारी, अर्ज आणि चौकशीच्या मागण्या करूनही नागरिकांच्या शंकांचे समाधानकारक निराकरण करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
उपसंचालक भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांनी चौकशीचे निर्देश दिले असतानाही स्थानिकांना विश्वासात न घेता प्रकल्पाची प्रक्रिया पुढे रेटली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
समाजसेवक राजाराम पाटील आणि मनोज माशेलकर यांनी पुनर्वसन प्रकल्पात पारदर्शकता आणि लोकसहभाग आवश्यक असल्याचे सांगत, स्थानिकांच्या संमतीशिवाय प्रकल्प राबविणे लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचे म्हटले आहे.
स्थानिक रहिवासी सूर्यकांत पावसकर यांनीही भूखंडासंदर्भातील मालकी हक्क, कागदपत्रे आणि आक्षेपांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, सर्व शासकीय चौकश्या पूर्ण होईपर्यंत प्रकल्पाची पुढील प्रक्रिया स्थगित करावी, खुली जनसुनावणी घ्यावी आणि सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या प्रकरणामुळे पुनर्वसन प्रक्रियेतील पारदर्शकता, मालकी हक्क आणि नागरिकांचा सहभाग या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
.jpg)




Post a Comment
0 Comments