Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मराठी भाषेचे भविष्य : आज आणि उद्या

            जेव्हा मनातील गाभाऱ्यातल्या तळातून शब्दसंपदा घुसळून वर काढली जाते त्यातून निघणारे नवनीतही तेवढ्याच प्रगल्भतेचे द्योतक असते. त्याचा पौष्टिक खुराक वाचकांच्या मनामनात रूंजी घालत असतो. साहित्यिकाची लेखणी समाजमनाचा आरसा असते. ती कधी मृदू ,कोमल तर कधी परखड बनते. तिच्या शब्दलालित्या ची जादू मनावर गारुड करते. आणि वाचक मंत्रमुग्ध होऊन जातो आपसुकच त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. वाह!किती सालंकृत रसाळ ही मायबोली! आणि त्या रसाळ मधुर मायबोलीचा अमृतकुंभ टिपून घेण्यासाठी हृदयाचे पक्षी गगन भरारी घेऊ लागतात.

              " माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन" असे म्हणत थोर योगी आणि उच्चकोटीच्या संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ओव्या, अभंगांमधून मराठीवर अलंकारांचा साज चढविला आहे. सामान्य माणसाला मराठीचा हा रसाळपणा चाखता यावा म्हणून संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे सार त्यांनी मराठीत ज्ञानेश्वरी लिहून लोकांपर्यंत पोहोचवले आहे. त्यानंतरच्या काळात इंग्रज भारतात आले आणि त्यांनी भारतावर राज्य केले. त्यांच्या सोयीसाठी आणि वैचारिक, व्यवहारिक देवाणघेवाणीसाठी त्यांनी भारतीयांना इंग्रजी शिकवले आणि आपण त्या इंग्रजीचे इतके आधीन झालो की आपली मायबोलीही विसरून गेलो. आपल्या तोंडात इंग्रजी शब्द इतके रुळले की काही शब्दांना मराठीत काय बोलतात इतकेही विस्मरण झाले. जरी इंग्रज परत गेले तरी त्यांनी इंग्रजीचा ठसा भारतीय मनावर चांगलाच उमटवला आहे. आता बर्‍याच परदेशी कंपन्या भारतात स्थापन झाल्या आहेत आणि त्यांची भाषा इंग्रजी  असल्याने मुलाखत किंवा कार्यालयीन कामे इंग्रजीतूनच होतात. यामुळे आपली मराठी मुले मागे पडू लागली. यावर पर्याय म्हणून पालकांनी आपली मुले  इंग्रजी माध्यमातून शिकण्यासाठी घातली. जगाच्या मार्केटमध्ये आपली मुले मागे पडू नयेत अशी भीती मनात बाळगून रूक्ष असणाऱ्या इंग्रजीला जवळ केले. पण मराठीचा अनमोल ठेवा आपल्या मुलांच्या मनात बिंबविणे हे देखील ज्येष्ठ पिढी विसरली. याचे पर्यवसान शहरातून मराठीच्या शाळा बंद पडू लागल्या. आता तरी खेड्यापाड्यातूनही इंग्रजीचे वारे वाहू लागले आहे. आपण फाडफाड इंग्रजी बोलू शकत नाही, आपल्या मुलांना इंग्रजी बोलता यावे हा हेतू मनात ठेवून सर्व पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात. भले तिथे किती ही फी आकारली जात असेल तरी.

                         या इंग्रजी संस्कृतीमुळे दिवसेंदिवस सी.बी.एस.ई, आय. सी. एस. ई.,आई.बी. सारख्या शाळांचे प्रस्थ वाढू लागले आहे.या माध्यमाच्या शाळांतुन मराठी विषयही वगळण्यात आला आहे. मराठी पालक जे मराठी माध्यमात शिकूनदेखील आज उच्चविद्याविभूषित आहेत आणि कार्यालयात उच्च स्थानी नोकरी करत आहेत त्यांनी इंग्रजीला प्राधान्य  न देता मराठीचा अमृतमय ठेवा जनामनात रूजवावा. आपण कितीही इंग्रजाळलो असलो तरी वाटेने चालताना ठेच लागली तर तोंडातून " आई गं" असेच येते किंवा प्रचंड मोठा साप दिसला तर " बापरे" असेच उद्गारतो. कारण आपली भाषा  जगाशी प्रेम करायला शिकवणारी आहे. तिचा रसाळ गोडवा शब्दांशब्दातून ओसंडून वाहताना दिसतो. मराठीबोली उच्चारताना आपल्या धमन्यांमधून रक्त सळसळायला हवे तरच मराठीचे महत्व जगाला समजेल. मराठी भाषा शिकण्यासाठी तरूण पिढी उत्स्फूर्तपणे पुढे यायला हवी. 

माझी रसाळ मायबोली,जणू अस्सल मौक्तिक

किती वर्णावी तिची गोडी, किती करावे मी कौतुक

आज मराठी भाषा व्यवहारातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आज या माध्यमातून  आणि इंग्रजी शिकण्याची पट्टी डोळ्यांवर चढवलेल्या मराठी मनाला ते खटकतही नाही.याउलट पालक कौतुकाने सांगतात, "आमच्या बेबीला मराठी बोलता येत नाही" मराठी माणसाच्या अशा वृत्तीमुळे मराठी भाषेचा र्‍हास होऊ लागला आहे. अनेक मराठी नामवंत लेखक, कवींनी मराठी भाषेतून लिखाण केलेले आहे. ते मुलांपर्यंत पोहोचतच नाही. कारण मराठीत बोलणारा गावंढळ, अशिक्षित समजला जातो. या उलट 'हाय हॅलो' 'बाय बाय' म्हणणारे आधुनिक समजले जातात. ज्या काही शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा असतो तेव्हा काठावर पास होण्यापुरताच अभ्यास करून मुलांना मराठी विषयापासून वंचित ठेवले जाते. म्हणजे महाराष्ट्रात राहूनही मराठीची अशी अवहेलना स्वीकारावी लागते याला जबाबदार मराठी माणूसच आहे. मधल्या काळात मनसेचे राजसाहेब ठाकरे यांनी मराठीला जीवदान मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. रेल्वेस्थानक, विमानतळ यांची इंग्रजी नावे काढून मराठी नामकरण करवले. दुकानाच्या पाट्या मराठीतच असाव्या हा अट्टाहास धरला पण एक दोघांनी पुढाकार घेऊन होण्यासारखे हे काम नव्हे. प्रत्येक मराठी माणसाने पुढे येवून त्यांना प्रतिसाद द्यायला हवा होता. त्यामुळे अशा योजना येतात आणि

साबणाच्या बुडबुड्याप्रमाणे विरून जातात.त्याला योग्य वाली मिळत नाही. मराठी माणूस नको तिथे आपल्यांचेच पाय खेचण्यात धन्यता मानतो हेच खरे.

दोन मराठी लोक एकत्र आले तरी हिंदी किंवा इंग्रजीतच संभाषण चालू करतात. कारण मराठी बोलताना कोणी ऐकू नये एवढी उपेक्षा करण्याइतकी माझी मायबोली ढिसाळ आहे का? यातील माधुर्य चाखण्याऐवजी थुंकण्यातच तुम्ही धन्यता मानली तर मराठीचं अस्तित्व टिकणारच नाही आणि पुढील पिढीपर्यंत मराठी भाषेचे वैभव पोहोचणारच नाही. पूर्वीपासून संत,पंत, तंत कवींनी मराठीचा हा राजमुकुट डोईवर घेऊन मिरविला तिच्या रसाळपणाची प्रचिती घेत आपण वाढलो पण आता मात्र तिला पायदळी तुडवू पहात आहात. शैक्षणिक बाबतीत मराठीला दुय्यम मानण्यात आलेच आहे. पण मराठी माणसांच्या घराघरातून संवादही इंग्रजी किंवा हिंदीतच होताना दिसतात. आपल्या भाषेची विल्हेवाट लावताना मराठी मनाला यातना होत नसतील का ? मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा उच्च स्थानी नोकरी करू शकत नाही का? आपण आपल्या पाल्याला रोज इंग्रजीतून  "बाबा ब्लॅक शिप" शिकवताना "शुभंकरोती" आणि "रामरक्षा" म्हणायला सांगावे. कृष्णा अर्जुनाच्या पराक्रमाच्या तसेच रामायण-महाभारतातील कथा  मराठी ग्रंथातूनच वाचण्यास सांगावे. तेव्हा पुढील पिढी मराठी भाषेला प्राधान्य देईल.

माझ्या मराठीचे भवितव्य अंधकारमय होऊ द्यायचे नसेल तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांना आपल्या राज्यातून हद्दपार करायला भाग पाडावे. तेव्हाच कार्यालयीन कामकाजही मराठीतूनच चालेल. मराठी भाषा गावंढळ न वाटता अभिमानाने मिरवत माझ्या मराठीचा झेंडा जगभरात पोहोचेल. मनाला भुरळ घालणारी मराठी भाषा शिकण्याचा परक्यांनाही मोह पडेल.आपल्या संस्कृत भाषेतील ज्ञान मिळविण्यासाठी परकीय तरूण तरूणी भारतात येत असतात.त्यांना भारतीय संस्कृतीविषयी, मराठी भाषेविषयी ओढा वाटु लागला आहे. आजही आपली भाषा कितीही इंग्रजाळलेली असली तरी मराठीचा गोडवा मात्र कायम आहे हे लेखक, कवी , शाहीर, कलाकार  या सर्वांनी दाखवून दिले आहे. मराठी भाषेतील अनेक सुप्रसिद्ध ग्रंथ, कथाकादंबऱ्या आपली अमूल्य संपत्ती आहे. तिचे जतन करणे प्रत्येक मराठी भाषिकाचे परमकर्तव्य आहे. हा मराठीचा अनमोल असा ठेवा आहे. त्याचा वारसा पिढ्यान् पिढ्या पुढे चालणारच आहे. फक्त मराठीच नव्हे तर अमराठी लोकांनाही गुणगुणायला लावणारा, त्यांच्या तालावर नाचायला लावणारा मराठीचा हा वेचा संग्रही नसेल तो दुर्भागीच म्हणायला हवा. आपल्या मराठीच्या उज्वल भवितव्यासाठी शासनानेही ठोस‌ पावले उचलायला हवीत. वाचकांविना बंद पडू लागलेली वाचनालये, ग्रंथालये मराठी ठेवा भरून सुसज्ज ठेवली तर लहानथोर सर्वांचीच पावले वाचनाच्या ओढीने तिकडे वळतील.

माझी मराठी बोली.. अमृतकुंभाचा ठेवा

वाचनाच्या प्रसादाने.. मराठी हृदयात रहावा

 या रसाळ मायबोलीचा विकास व्हावा, सर्वजनामुखी तिची गोडी चाखली जावी हे मराठी माणसाला न वाटावे ते नवल! पण ही गोडी लागण्यासाठी मागच्या पिढीने पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या मुलांनातवंडांना मराठी शाळेतच प्रवेश घ्यावा. त्यांच्याशी मराठीतूनच संवाद साधावा. घरात मराठी पुस्तकांचा संग्रह असावा. त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून दुरदर्शन, मोबाईलची नव्हे तर पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करावी. जितके शक्य असेल तितके मुलांना गोष्टीरूप रामायण, महाभारतातील कथा सांगाव्या, संतांचे कार्य समजवावे. मराठी कविता गाऊन दाखवाव्या. रामरक्षा, गीताई, गणपतीस्तोत्र मुखोद्गत करून घ्यावे तरच लहानग्यांना मराठी भाषेची गोडी वाटेल आणि मराठी भाषेची देणगी पिढ्या न् पिढ्या जतन होईल. तिचा गोडवा चाखण्यासाठी भारतीयच नव्हे तर परदेशी लोकंही भारताची वाट चोखाळतील पण मराठी माणसाने मराठीकडे पाठ फिरवू नये हेही तितकेच खरे. जात्यावरच्या ओव्या, मंदिरातली भूपाळी किंवा शाहीरी कवने यांच्या निर्मिती आणि प्रसारासाठी सर्वतोपरी प्रोत्साहन द्यावे. तरच नव्या पिढीची पावले मराठी शाळांकडे, मराठी वाचनाकडे आपसूकच वळतील.

किती गाऊ तिचे गुण ..  माझी रसाळ ही वाणी

गुण गाता सरली रात..  खेळवी झुळझुळ गाणी


 


Post a Comment

0 Comments