ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या माध्यमातून आगरी समाजाची संस्कृती व समृद्ध परंपरा जतन आणि संवर्धन करण्याचे कार्य होत आहे. दरवर्षी लाखो नागरिकांची महोत्सवात गर्दी होत असून महोत्सवाच्या यशस्वी आयोजनातून `आगरी युथ फोरम'ने २१ वर्षांपासून समाजापुढे आदर्श उभा केला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे केले.
अखिल भारतीय आगरी महोत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, २१ व्या आगरी महोत्सवाचे अध्यक्ष शरद पाटील, `आगरी युथ फोरम'चे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
संत सावळाराम महाराज म्हात्रे यांच्या भूमीमध्ये सुरू झालेला आगरी महोत्सव दरवर्षी नवी उंची गाठत आहे. दरवर्षी जल्लोषात होणाऱ्या या महोत्सवात जोश व उत्साह असतो. गेल्या २१ वर्षांपासून महोत्सवाने आगरी समाजाच्या संस्कृती व परंपराची माहिती नव्या पिढीबरोबरच इतर समाजापर्यंत पोचविली. त्यातून आगरी संस्कृती व समृद्धीचे जतन होत आहे. तसेच आगरी खाद्यपदार्थांना मोठी लोकप्रियताही मिळवून दिली, याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
संत सावळाराम महाराज म्हात्रे यांच्या स्मारकाला राज्य सरकारने १० एकर जमीन दिली असून, स्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नेतिवली येथील टेकडीवर भव्य स्मारकाचे काम लवकरच सुरू होईल. त्यातून हजारो नागरिकांना प्रेरणा मिळेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
.jpg)

Post a Comment
0 Comments