ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मागील पाच वर्षापासून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ सुरू असलेला रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा प्रकल्प (सॅटिस) गतीने पूर्ण करण्यात यावा, या प्रकल्पातील तांत्रिक अडथळे लवकरात लवकर दूर करावेत, यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी १० ऑक्टोबरला या प्रकल्पाची दोन तास पायी पाहणी केली होती. या पाहणीनंतर येत्या जानेवारी ते एप्रिलपर्यंत सॅटिस प्रकल्पासह या भागातील उड्डाण पूल टप्प्याने खुले होतील, अशाप्रकारे कामाची गती वाढवण्यात यावी अशा सूचना दिल्या होत्या. तद्नंतर लगेचच ६ व्या दिवशी आयुक्तांनी गुरुवारी रात्री १२.३० ते २ पर्यंत डॉ.आंबेडकर उद्यानासमोरील गर्डर्स बसवतांना स्वतः उभे राहून दोन्ही गर्डर वर बसवेपर्यंत संपूर्ण वेळ कामाची पाहणी केली . आयुक्त अभिनव गोयल स्वतः आय आय टी चे स्थापत्य अभियंता असल्यामुळे या सर्व प्रकल्पांची बारकाईने पाहणी केली. या पाहणीच्यावेळी आयुक्त अभिनव गोयल यांच्या सोबत शहर अभियंता अनिता परदेशी, उप अभियंता संदिप तांबे, पीएमसीचे अभियंते आणि ठेकेदाराचे सल्लागार, अभियंते उपस्थित होते.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक हे सर्वाधिक प्रवासी वर्दळीचे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकालगतच्या वाहतुकीत सुसुत्रता आणावी म्हणून गेल्या सात वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने रेल्वे स्थानक वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेण्याचे निश्चित केले. या प्रकल्पासाठी ४९८ कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला. शासनाचे या प्रकल्पासाठी साहाय्य मिळाले. सन २०२१ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प सन २०२३ मध्ये पूर्ण करण्याची मुदत होती. या प्रकल्पाच्या उभारणीत भूसंपादन, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या जागेवर काम करण्यास त्यांची नाहरकत , रेल्वेच्या जागा, हाॅटेलची बांधकामे, आनंदगाळेधारकांचे पुनर्वसन, डॉ.आंबेडकर उद्यानातील जागा इत्यादी विषय मार्गी लागेपर्यंत त्या भागाची कामे बंद ठेवावी लागली. त्यामुळे प्रकल्प कामाला विलंब झाला. आता जागेच्या सर्व अडचणी जवळपास संपुष्टात आल्या आहेत, त्यामुळे आता या जागेवर कामे जलदगतीने सुरू करण्यात आली आहेत अशी माहिती आयुक्तांनी दिली .
.jpg)





Post a Comment
0 Comments