ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अक्षय ऊर्जेचा वापर ही काळाची गरज आहे, आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा सयंत्रे,तसेच महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी ऊर्जा कार्यक्षम एल.इ.डी.लाईट, फॅन व 5 स्टार रेटिंग घरगुती विज उपकरणाचा वापर करून ऊर्जा बचत करावी,असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात अक्षय ऊर्जा दिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत निरीक्षक भुषण मानकामे, महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त संजय जाधव, कांचन गायकवाड, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, उप अभियंता भागवत पाटील, जितेंद्र शिंदे , इतर अधिकारी व विद्युत विभागातील कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
भारतात 58% विद्युत निर्मिती कोळशापासून होते. या प्रक्रियेत कार्बन डॉय ऑक्साईड या घातक वायुची निर्मिती होत असल्यामुळे, नेहमी हरित ऊर्जेचा म्हणजे अक्षय ऊर्जेच्या वापरास प्राधान्य दिले पाहिजे , अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत,"महापालिकेने सौर ऊर्जा क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी" या पुस्तिकेचे तसेच हस्तपत्रकांचे, जनजागृतीपर फलकाचे अनावरण महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांचे हस्ते करण्यात आले. यावर्षीच्या श्री गणेशोत्सवात सर्व विसर्जन स्थळी या हस्तपत्रकांच्या माध्यमातून अक्षय ऊर्जेबाबत जनजागृती केली जाईल, अशीही माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी दिली. यावेळी विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत अक्षय ऊर्जा, सोलार एनर्जीचा वापर या संदर्भात एका लघु नाटक सादरीकरण करून अक्षय ऊर्जाबाबत उपस्थित महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांना माहिती देण्यात आली.
Post a Comment
0 Comments