ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
कल्याण ग्रामीण तालुक्यातील निळजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. ०५ जुलै, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानाअंतर्गत “निक्षय मित्र” या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत क्षयरोग (टी.बी.) ग्रस्त रुग्णांना पोषण आहार किटचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात निक्षय मित्र म्हणून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते ८० रुग्णांना पोषण किटचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना आमदार मोरे यांनी सांगितले की, "टी.बी. सारख्या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी औषधोपचारासोबतच संतुलित व पुरेसा आहार अत्यावश्यक आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत या रुग्णांना नियमितपणे पोषण आहार किट देण्यात येणार आहेत."
"निक्षय मित्र" या उपक्रमातून रुग्णांना केवळ अन्नसुरक्षा मिळत नाही, तर त्यांना समाजाच्या सहानुभूतीचा, आधाराचा आणि प्रेमाचा अनुभव येतो. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये मानसिक उभारी निर्माण झाली असून त्यांनी या सामाजिक भानाबद्दल आमदार राजेश मोरे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कल्याण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूनम जयकर यांनी विशेष मेहनत घेतली. निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे, तसेच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (NTEP) अंतर्गत करण्यात आले. आरोग्य केंद्राच्या टीमने रुग्णांच्या नियमित तपासणी, औषधोपचार व समुपदेशन यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. स्थानिक प्रशासनाने या रुग्णांसाठी सातत्याने सेवा पुरवण्याचे आश्वासन यावेळी दिले.
सामाजिक उत्तरदायित्वातून उभा राहिलेला "निक्षय मित्र" उपक्रम म्हणजे समाज आणि रुग्णांमधील विश्वासाचे नाते बळकट करणारा पूल आहे.
०००
Post a Comment
0 Comments