डॉ. द्वारकानाथ कोटणीस म्हणजे चिनी लोकांसाठी एकदम हळवा कोपरा. जितकं प्रेम आणि आदर कोटणीस यांना चीनने दिलं आहे कदाचितच ते या एखाद्या आधुनिक भारतीयाच्या वाट्याला आलं असेल.एखाद्या रॉकस्टार प्रमाणे ते चिनी लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.
ब्लॅक अँड व्हाईट विशेष लेख
चीनची भारताबद्दल असलेली भूमिका ही म्हणावी तेवढी चांगली राहिलेली नाहीये, चीनने अनेकदा भारताविरोधात पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं देखील समोर आले आहे, चीनने कधी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला तर कधी छुपा पाठिंबा दिला, चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा देखील पुरवठा करण्यात येतो, ज्याचा वापर पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांसाठी केला जातो.
चीन कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. मात्र दुसरीकडे चीनमध्ये एका मराठी माणसाची पूजा केली जाते, चीनमध्ये या माणसाचे काही ठिकाणी पुतळे देखील आहेत. एवढंच नाही तर चीनचा कोणी उच्चपदस्थ व्यक्ती आजही भारतात आला तर या माणसाच्या कुटुंबाची आवर्जून भेट घेतो,
या मराठी माणसाचं नाव आहे, डॉ. द्वारकानाथ कोटणीस, 1937 साली जपानने चीनवर आक्रमण केलं. या युद्धात चीनची प्रचंड हानी झाली, सैन्यबळ जखमी झालं. अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. चीनमध्ये हाहाकार उडाला, तेव्हा चीनच्या लष्कर प्रमुखांनी इतर देशांना वैद्यकीय मदत पुरवण्याचं आवाहन केलं होतं. चीनला मदत करावी म्हणून एक पत्र भारताला देखील पाठवण्यात आलं होतं. या पत्रानंतर भारतातून एक डॉक्टरांची टीम चीनला पाठवण्यात आली होती. त्यामध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा देखील समावेश होता.
भारतानं 1938 मध्ये एक रुग्णवाहिकेसह पाच डॉक्टरांचं पथक चीनला पाठवलं होतं. यामध्ये डॉ. द्वारकानाथ कोटणीस देखील चीनला गेले होते. तिथे या डॉक्टरांच्या पथकानं तब्बल साडेतीन वर्ष चीनी सैनिकांवर उपचार केला, असं म्हटलं जातं की, डॉ. कोटणीस यांनी सलग 72 तास कोणताही ब्रेक न घेता चीनी सैन्यांची ऑपरेशन्स केली, त्यांनी या युद्धामध्ये जखमी झालेल्या तब्बल 800 चीनी सैनिकांचे प्राण वाचवले, त्यामुळे त्यांना आजही चीनमध्ये देव मानलं जातं. त्यांची पूजा केली जाते. चीनमधील काही शाळा आणि संग्रहालयांना देखील कोटणीस यांचं नाव देण्यात आलं आहे, तसेच तिथे काही ठिकाणी त्यांचा पुतळा देखील असल्याचं पाहायला मिळतं.
ली लोंग ची हे बेथून मेडिकल कॉलेजमध्ये राजकीय आयुक्त पदावर कार्यरत होते. कोटणीस यांच्या त्यावेळच्या सहकाऱ्यांना भेटून आणि तसेच तत्कालीन कागदपत्रांचा वापर करून त्यांनी डॉ. कोटणीसांचे चरित्र लिहिले आहे.
चीनच्या टीव्हीसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात की "जेव्हा डॉ. कोटणीस चीनमध्ये पोहोचले तेव्हा जपानच्या हल्ल्यात अनेक गावं बेचिराख झाल्याचं त्यांनी पाहिले. "अनेक लोक जखमी अवस्थेत होते आणि काही ठिकाणी ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचं काम सुरू होतं असं डॉ. कोटणीसांनी पाहिलं होतं.
ली लोंग ची सांगतात, "युनानमध्ये जिथं त्यांनी काम सुरू केलं ते तर रुग्णालय पण नव्हतं केवळ गुहेसारख्या ठिकाणी बेड टाकण्यात आले होते. या सर्व गोष्टींमुळे ते थोडे नाराज झाले पण या लोकांसाठी काही करावं या उद्देशाने ते पेटून उठले."
प्रेम आणि लग्न
डॉ. कोटणीस हे अस्खलितपणे मंदारिन (चीनची भाषा) बोलू शकत. त्यांची मैत्री त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नर्स क्यो क्विंगलन यांच्याशी झाली.मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी यिनहुआ ठेवलं. चिनी भाषेत यिन म्हणजे चीन आणि हुआ म्हणजे भारत. दोन्ही देशांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून त्याचं नाव त्यांनी यिनहुआ असं ठेवलं होते.क्यो या कोटणीस यांच्या टीमचा भाग होत्या आणि त्यांची टीम रोज अंदाजे 50 सैनिकांवर उपचार करत असे.
प्लेगचा सामना
एकीकडे चीनचा सामना जपानच्या आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या सैन्याशी सुरू होता. यात जखमी होत असलेल्या चिनी सैनिकांची संख्या बरीच असायची. या संकटाशी तोंड देणं हे जिकरीचं काम होत असतानाच प्लेगची साथ आली.प्लेगची लागण झालेल्या सैनिकांची सेवा करण्यास ते मागे पुढे पाहत नसत. ते त्यांच्या कामाप्रती समर्पित होते ही बाब तर सर्वांना ठाऊकच होती पण त्यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय एका घटनेतून झाला
ते म्हणजे प्लेगची नवीन लस आली होती. तिचा वापर केल्यास काय होईल याचा काहीच अंदाज कुणाला नव्हता. पण ती लस त्यांनी घेतली. स्वतःवर प्रयोग करून त्यांनी इतरांवर उपचार केले.
सातत्याचे काम, दगदग यामुळे इतर लष्करी तळावरचे डॉक्टरदेखील आजारी पडू लागले होते. डॉ. कोटणीस यांना देखील अपस्माराचे झटके आले होते. पहिला झटका सौम्य होता पण दुसऱ्या झटक्यामुळे त्यांचे 9 डिसेंबर 1942 रोजी निधन झाले.
चीनमधील नानकान गावात शहीदांच्या भूमीतच त्यांचे दफन करण्यात आले.
"सैन्यानं एक चांगला सहकारी आणि देशानं एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवण सदैव आपल्या मनात तेवत ठेवूया," असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटणीसांना आदरांजली वाहताना काढले होते.
त्यांच्या स्मरणार्थ चीनने हेबेई प्रांतातील शिजियाझुआंग शहरात स्मारक बांधले आहे. चीनमध्ये किंगमिंग फेस्टिवलवेळी आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहतात.
2005 मध्ये त्यांच्या समाधीवर चिनी लोकांना फुलं वाहून त्यांच्या प्रती असलेली प्रेमभाव दाखवला. जणू डॉ. कोटणीस हे आपल्या पूर्वजांपैकीच एक आहेत असे त्यांनी आपल्या कृतीतून सांगितले.डॉ. कोटणीस यांच्या निधनानंतर क्यो या भारतात बऱ्याच वेळा येऊन गेल्या आणि त्या कोटणीस यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात कायम राहिल्या.
1946 साली व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यावर 'डॉ. कोटणीस की अमर कहानी' हा चित्रपट काढला होता. या चित्रपटात डॉ. कोटणीस यांची भूमिका त्यांनी स्वतः साकारली होती.
.jpg)




Post a Comment
0 Comments