Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये १६० वर्षांपासून सार्वजनिक वाचनालय जपतंय वाचन संस्कृती

  २३ एप्रिल  जागतिक पुस्तक दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे उभारण्यात आली पुस्तकांची सुंदर कलाकृती


               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

२३ एप्रिल  जागतिक पुस्तक दिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय कल्याण येथे पुस्तकांची सुंदर कलाकृती उभारण्यात आली असून कल्याणमध्ये १६० वर्षांपासून सार्वजनिक वाचनालय वाचन संस्कृती जपत आहे.

१८५७ चे स्वातंत्र्य समर संपून अवघी ७ वर्षे झाली होती आणि त्याच काळी कल्याणमध्ये साहित्य चळवळीला सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या रुपाने सुरुवात झाली. या वाचनालयाची स्थापना ही १८६४ साली रावबहादुर सदाशिव साठे यांनी केली. सध्या ६ हजार ५०० वाचक संख्या असलेल्या या वाचनालयात १ लाख ५० हजार ग्रंथ आहेत. इतिहासविषयक १ हजार ६०० पुस्तके तर राजकीय विषयक ३ हजार पुस्तके या वाचनालयात आहेत. १६ कर्मचारी १२ तास हे वाचनालय चालवतात. 



शासनाच्या ‘अ’ दर्जा प्राप्त वाचनालयांमध्ये सार्वजनिक वाचनालय कल्याण मोडते. कल्याणचा सांस्कृतिक इतिहास, किल्ले दुर्गाडी, सुभे कल्याण ही तीन कल्याणच्या इतिहासावरची जुनी पुस्तके देखील वाचनालयात आहेत. मात्र, सध्या कल्याणकर वाचकांची साहित्याची हौस पुरवणाऱ्या या वाचनालयाला दुर्मिळ ग्रंथ जपण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत.

वाचनालयातील सहग्रंथपाल करूणा कल्याणकर  यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या वाचनालयात ६७७ जुने दुर्मिळ ग्रंथ आहेत. हे ग्रंथ टिकवण्यासाठी आमची कर्मचारी त्यातील ग्रंथ मोबाईलवर स्कॅन करते. असे काही ग्रंथ आम्ही मोबाईलवर स्कॅनही केले आहेत. या ग्रंथांचे अत्याधुनिकरित्या स्कॅनिंग करणे आवश्यक आहे.”

दरम्यान, सार्वजनिक वाचनालय कल्याणमध्ये अत्यंत जुने ग्रंथ असून ते जपण्याचे मोठे काम या ग्रंथालयाकडून होत आहे. यासाठी ग्रंथालय प्रशासनाचे साहित्यप्रेमी वाचकांकडून कौतुकही होत आहे. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना मोठ्या मदतीची गरज साहित्य वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

एरव्ही कल्याणमध्ये हजारो रुपयांची बॅनरबाजी करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांचे या वाचनालयाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे जुन्या कल्याणकरांचे म्हणणे आहे. २००४ साली माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी व २०१४ साली माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी या वाचनालयाला मदत केली होती. त्यानंतर आजतागायत पुढारी या जुन्या साहित्यरुपी वटवृक्षाकडे फिरकले देखील नसल्याची खंत सामान्य वाचक व्यक्त करत आहेत.

आजच्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून या सार्वजनिक वाचनालय कल्याणमध्ये ‘पुस्तक, चहा आणि बरंच काही...’ हा कार्यक्रम पार पडणार असून प्रा. डॉ. बिपिन वाडेकर वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. आज सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या सभागृहात पार पडेल.

दुर्मिळ साहित्य
महाराष्ट्र काव्यग्रंथ सीतास्वयंवर – १८२६
संस्कृतकाव्यानी – सुजाता जोग – १८३२
जिओग्राफी अँड अस्ट्रॉनॉमी – १८३२
वृक्षवर्णन – १८५७
महाभारत - १८६६
व्यवहारदर्पण – १८७३

Post a Comment

0 Comments