कल्याणातील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड
अकाऊंटंट्सच्या भव्य इमारतीचे
खा.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन
ब्लॅक अँड व्हाईट (कल्याण) कुणाल म्हात्रे
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया म्हणजेच आयसीएआय या देशातील नामांकित संस्थेचे कल्याणात होणारे सुसज्ज आयसीएआय भवन हे शहरासाठी अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काढले. चार्टर्ड अकाऊंटंट्स संस्थेच्या कल्याण डोंबिवली शाखेच्या इमारतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात प्रमूख पाहुणे म्हणून खा. डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते.
कल्याणात होणाऱ्या या चार्टर्ड अकाऊंटंट्स संस्थेच्या सुसज्ज इमारतीचा लाभ केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर भिवंडी, शहापुरपासून थेट बदलापूर, कर्जतपर्यंतच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांना आता सीए संबंधित शिक्षण- प्रशिक्षणासाठी मुंबईला न जावे लागता आता याच इन्स्टिट्युटमधून सर्व गोष्टी उपलब्ध होणार आहे. आम्ही सर्व जण यापुढेही आपल्यासोबत असून एक चांगली संस्था याठिकाणी उभी करा असे आवाहनही खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.
कल्याणात होणाऱ्या या सुसज्ज आयसीएआय भवनमुळे सामान्य कुटुंबातील मुलांनाही आता सीए होण्यासाठी दिशा आणि व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याची भावना कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केल्या. या आयसीएआय भवनमूळे कल्याण शहराचे नाव आणखी उंचावले जाणार असून इथल्या भावी पिढीला करिअरसाठी हे भवन एकप्रकारे वरदान ठरेल असा आशावादही आमदार भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
तर भारत देश प्रजासत्ताक होण्यापूर्वीच म्हणजेच 1949 मध्ये आयसीएआय संस्थेची निर्मिती झाली आणि संविधानही अस्तित्वात आले. ते पाहता देशाच्या जडण घडणीमध्ये ही संस्था आणि या संस्थेच्या देशातील लाखो सीएंचे मोठे योगदान असल्याचे मत आयसीएआय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजित अग्रवाल आणी राष्ट्रीय उपाध्यक्ष चरणज्योतसिंग नंदा यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये देशात आयकर भरणाऱ्यांची संख्या तब्बल 12 टक्क्यांनी वाढल्याची माहिती देत देशाच्या आर्थिक विकासातील सीएंचे महत्त्व अग्रवाल यांनी यावेळी अधोरेखित केले.
कल्याण डोंबिवली शाखेचे दिवा भिवंडीसह थेट कर्जत कसाऱ्या पर्यंतच्या भागातील तब्बल 5 हजारांहून अधिक चार्टर्ड अकाऊंटंट सदस्य आणि 15 हजारांहून अधिक विद्यार्थी संलग्न आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात तब्बल 17 गुंठ्यांचा भुखंड चार्टर्ड अकाऊंटंटसच्या कल्याण डोंबिवली शाखेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामध्ये सुसज्ज असे ऑडीटोरियम, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, कॉम्प्युटर कक्षासह क्लासरूम ट्रेनिंग सेंटर येत्या वर्षभरात बांधण्यात येईल अशी माहिती अध्यक्ष सीए मयुर जैन आणि समिती सदस्य सीए कौशिक गडा यांनी दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, केडीएमसीचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील,माजी नागरसेवक अरविंद मोरे, संजय पाटील, जयवंत भोईर, गणेश जाधव, सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए मंगेश किनरे, सीए प्रिती सावला, पियूष छाजेड यांच्यासह कल्याण डोंबिवली ब्रँचचे अध्यक्ष सीए मयूर जैन, उपाध्यक्ष राकेश अग्रवाल, सचिव अमित मोहरे,खजिनदार विकास कामरा, ब्रँच नॉमिनी अंकित अग्रवाल, मूर्तुझा काचवाला यांच्यासह सीए रोशनी भावनानी, गिरीश तारवानी, पराग प्रभुदेसाई, प्रदीप मेहता, कौशिक गडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments