Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वायू प्रदूषणाने श्वास का कोंडतोय?


                ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली बापू वैद्य 
गेल्या अनेक दिवसांपासून वायू प्रदूषणाने कळस गाठला आहे. त्यामुळे हवा विषारी तर झाली आहेच; पण मुंबईचाही श्वास कोंडला आहे. लागोपाठ दोन दिवस झालेल्या प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या विषारी धुरक्यांत शहरातील रस्तेही हरवून गेल्याचं वास्तव मुंबईकरांनी पाहिलं. हे वायू प्रदूषण मुंबईकरांची पदोपदी श्वासकोंडी करत आहे. साधं घरातून बाहेर पडल्यावर रस्त्याने चालताना आपलं नाकतोंड जॅम करणारी धूळ नवनवीन आजारांना निमंत्रण देते आहे. प्रदूषणाच्या क्रमवारीत नवी दिल्ली आणि कोलकात्यानंतर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून आपल्या मुंबईचा नंबर लागतो आहे. झकास विकासाच्या नावाखाली मुंबई महानगरी प्रदूषणाच्या धुरक्यात हरवत चालल्याने दिवसेंदिवस भकास आणि उदास दिसू लागली आहे. पहाटेच्या वेळी शुद्ध हवा खाण्यासाठी चालण्याचा तसेच इतर व्यायाम करण्याचा सल्ला देणारे सल्लागारही थंडीच्या दिवसात गप्पगार आहेत. काही तज्ज्ञ सांगत आहेत की मुंबईची सकाळची हवा अधिक प्रदूषित झाल्याने शक्यतो चालण्यासाठी घराबाहेर पडू नये. आपले हे हाल करण्याला कोण कारणीभूत आहे, असा सवाल आपणच आपल्या मनाला पुसल्यास काय उत्तर येईल? मॅनग्रोव्हच्या गर्द झाडीने कधीकाळी मोकळीढाकळी वाटणारी मुंबई हळहळू काँक्रिटच्या जंगलात कशी परावर्तित झाली हे सर्व आपल्या डोळ्यांदेखत घडलं. 
टोलेजंगी इमारतीचं रान पेटवण्यासाठी सिमेंटचा धुरळा मुंबईभर उडवण्याला आपणचं प्राधान्य दिलं. बरं हा धुरळा खाली बसावा म्हणून मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने आखलेल्या नियमावलीलाही मुंबईत ठिकठिकाणी वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे उद्योग बिनदिक्त सुरू आहेत. 


मुंबईत एसआरए तसेच खासगी इमारतींची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र, ही कामे सुरू असताना परिसरातील वातावरण धुरक्याचं होईल तिथं सकाळ, संध्याकाळ पाण्याचा मारा, फवारा करावा याचे पालन सर्वच ठिकाणी सक्तीनं होत असं नाहीचं. मुंबईतील वायू प्रदूषणाला गेल्या काही वर्षांत हातभार लावणार्‍या घटकांत प्रामुख्याने औद्योगिक कारख्यान्यांतून अव्याहतपणे निघणारा धूर, वाढत्या वाहन संंख्येमुळे मोठ्या प्रमाणावर हवेत मिसळणारा धूर, इमारती व मेट्रोसारख्या इतर प्रकल्पांसाठी होणार्‍या बांधकामांतून उडणारा धुरळा, मुंबईत कचर्‍याची विल्हेवाट ही मोठी समस्या असताना मुंबई-ठाणे महामार्गावर कांजूरमार्ग येथे असलेल्या डंपिंगला अर्थात कचर्‍याला लागणार्‍या आगी. मुंबईत गेल्या काही वर्षांत लोंढ्यामुळे वाढलेली गर्दी मुंबईची एकूणच भौगोलिक परिस्थिती बदलून गेली आहे. निसर्गचक्रात घडलेल्या बदलामुळे सातत्याने बदलणारे हवामान, मुंबईच्या वातावरणात वाढलेलं आद्रतेचं प्रमाण याचा एकूण परिणाम मुंबई, ठाणेकरांच्या आरोग्यावर होतो आहे. धुळीची अ‍ॅलर्जी आधीच दमा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांचे आरोग्य सलाइनवर आणत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी बिघडलेली ही हवा अधिक घातक बनत चालली आहे. शहरात सध्या थंडी आणि प्रदूषणामुळे निमोनियाच्या तापाचे रुग्ण वाढले आहेत. डॉक्टरांच्या मते, न्यूमोनिया आणि विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत्या प्रदूषणामुळे वाढतो आहे. लहान मुले आणि वयोवृद्धांना याचा अधिक त्रास जाणवतो आहे. मुंबईतील हवेचा दर्जा सातत्याने खालावत असल्याने देशाची आर्थिक राजधानी नवी दिल्लीसोबत बरोबरी साधू लागली आहे. वर्ष २०२३ मध्ये मुंबई शहराच्या सभोवती जवळपास ६ हजार बांधकामासंबधी साइट्स सुरू असल्याचं समोर आलं होतं.  या वर्षी ही संख्या वाढून ११ हजारांच्या घरात गेली आहे. यामध्ये मेट्रो तसेच सरकारच्या इतर बांधकाम प्रकल्पांचाही  समावेश आहे. यावरून जीवघेण्या वायू प्रदूषणाविषयी आपण किती सजग आणि जागरूक आहोत, हे पाहायला मिळावं. ठाणे शहरात एक दोन नव्हे तर तब्बल ५९ टोलेजंगी टॉवर्सचे काम सुरू आहे. त्याखालोखाल नवी मुंबईत १५ इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मुंबईकरांकडून मुंबईकरांची श्वासकोंडी करण्यात सर्वात मोठी भूमिका आहे ती मुंबईतील वाहनसंख्येची. मुंबईतील वाहनांची संख्या सध्याच्या घडीला जवळपास १२ लाखांच्या घरात आहे यावरून आपल्या लाडक्या मुंबईत सोन्याचा धूर निघण्याऐवजी प्रदूषणाचा धूर किती बेफाम वाहतो आहे, याचा अंदाज यावा. 


माणसांच्या बरोबरीनं मुंबईत वाढत असलेली वाहनसंख्या वाहतूककोंडी आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर होणारे वायूप्रदूषण हे वजाबाकीऐवजी गुणकाराचे गणित मांडत आहे. मुंबई ते ठाणे आणि पश्चिमेकडील चर्चगेट ते विरार प्रवासात दाट धुक्यांमुळे लोकल आणि भारतीय रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचं आपण वाचत होतो. मात्र, गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलून हवेतील धुरकेच मुंबई अदृश्य करायला निघाले आहे. सध्याच्या घडीला तापमानात झालेली घसरण, वायुप्रदूषण त्यामुळे थंडीत सकाळी पसरणारे धुरके यामुळे फ्लू, न्यूमोनिया आणि श्वसनाचे आजार वाढवण्यास कारण ठरत आहेत. पण, आपण मुंबईकर रॉबर्ट, स्पायडरमॅन असल्यानं स्पर्धा आणि धावपळीच्या युगात वायूप्रदूषासारख्या गोष्टीही हलक्यात घेत हर फिक्र को धुँवे मे उडाता चला गया.. अशा आवेशात आहोत. या वायूप्रदूषणाचा सामना केवळ मुंबई, ठाण्यासारखी शहरेच नाहीतर महाराष्ट्र राज्यातील २२ शहरेही या यादीत जोडली गेली आहेत. चिंचवड, मालेगाव, खेड, जुन्नर, धुळे, नाशिक, आहिल्यानगर, कोल्हापूर, भुसावळ, नांदेड, पुणे, जळगावही प्रदूषित शहरांच्या यादीत गणले जात आहे. हवेतील वाढती धूळ, विषारी वायू आणि ऑक्सिजनचे कमी प्रमाण यामुळे आपल्यातील अनेकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. 
सर्दी-खोकला हे आजार अ‍ॅलर्जीचे असले तरी त्यामुळे न्यूमोनियाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. प्रदूषण आणि त्यानंतरचे व्हायरल इन्फेक्शन हे बालपणातील दमा आणि धुळीची अ‍ॅलर्जी असलेल्या मुलांमध्ये न्यूमोनियाचे ट्रिगर पॉइंट ठरत आहेत, अशा परिस्थिती बाहेर पडताना तोंडावर मास्कपट्टी बांधून फिरणे हाच तज्ज्ञांकडून सूचवला जाणारा एकमेव उपाय आहे. पण, वायूप्रदूषणाचा दिवसेेंदिवस वाढत चाललेला हा फास अधिक घट्ट होत गेल्यास मुंबईकरांना घराबाहेर फिरणेही कठीण न होवो म्हणजे मिळवली.

Post a Comment

0 Comments