Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

म्हारळ जलशुद्धीकरण केंद्रातील अपघातात कामगाराचा मृत्यू

 

           ब्लॅक अँड व्हाईट / उल्हासनगर प्रफुल केदारे
म्हारळ गावातील जलशुद्धीकरण केंद्रात काम सुरू असताना सुरक्षेच्या अनास्थेमुळे एका ३५ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. क्रेन चालकाच्या निष्काळजीपणामुळे बबलू कनोजिया या कामगाराचा ३० फूट खोल टाकीत कोसळून जागीच मृत्यू झाला. ठेकेदार कंपनीने सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली नसल्याचे समोर आले असून, या घटनेने कामगार सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

उल्हासनगर शहराच्या सीमेलगत असलेल्या म्हारळ एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रातील टाकी क्रमांक तीनच्या ब्रीजच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. या कामासाठी मोठी क्रेन मागवण्यात आली होती. मात्र, कामगारांनी कोणताही निर्देश न देता क्रेन चालकाने निष्काळजीपणे ब्रीज उचलला. या क्रेनचा जोराचा झटका लागल्याने बबलू कनोजीया हे कामगार संतुलन गमावून थेट ३० फूट खोल पाण्याच्या टाकीत कोसळले. तातडीने त्यांना वर काढण्यात आले, पण दुर्दैवाने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर काम ठेकेदारी कंपनीकडून सुरू होते. मात्र, या ठिकाणी कामगारांसाठी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा उपकरणे किंवा उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. ही ठेकेदार कंपनीची बेफिकीरीच या अपघातास कारणीभूत ठरली असल्याचे मत व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. क्रेन चालक आणि ठेकेदार कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे कामगार संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यांनी ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुरक्षेचा अभाव असल्याने अनेक कामगारांचे जीव धोक्यात येत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.

Post a Comment

0 Comments