महायुतीच्या विजयासाठी कटिबद्ध
माजी आमदार नरेंद्र पवार यांचे
समर्थकांना कामाला लागण्याचे आवाहन
निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर
पवारांनी साधला कार्यकर्त्यांशी
जनसंवाद
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
"जी यंत्रणा माझ्या निवडणुकीसाठी तयार केली होती ती यंत्रणा कल्याण डोंबिवलीतील चारही उमेदवारांच्या विजयासाठी वापरा आणि महायुतीच्या विजयासाठी कामाला लागा"! असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या समर्थकांना केले आहे.
नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मंगळवारी कार्यकर्ते, समर्थकांशी आणि कल्याणकर नागरिकांशी जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र पवार आणि त्यांच्या समर्थकांची पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत नरेंद्र पवार तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची जबाबदारी घेतली असल्याचे स्पष्ट केले. तर नरेंद्र पवार यांनी कल्याण मेट्रो, रिंगरोड प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, मल्टीस्पेशलेटी हॉस्पिटल आणि डॉ. आंनदीबाई जोशी स्मारक प्रकल्प रखडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे आश्वासन पवार यांना दिले.
दरम्यान यासर्व राजकीय घडामोडी नंतर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी कल्याण पश्चिमेती बालाजी गार्डन हॉल येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या जनसंवाद मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, धार्मिक संस्थांचे कार्यकर्ते, महिला, युवक व युवती बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करीत महायुतीचे उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांना बहुमताने निवडून आणण्याचा शब्द मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचे सांगितले. म्हायुतीच्या विजयासाठी सर्वांनी कामाला लागा असे त्यांनी स्पष्ट केले. मी भाजपा पक्षाच्या विचारांची कास कधीच सोडणार नाही, माणसाचे पद शाश्वत नसते तर पक्षनिष्ठा शाश्वत असावी लागते. मला विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काही पक्षांच्या थेट ऑफर होत्या. मात्र मी भाजपा विचारांशी कायम एकनिष्ठ राहील त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष न देता. व्यक्ती नाही तर पक्ष मोठा, या भावनेने सर्वांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करा. पक्ष माझ्या व तुमच्या कार्याचा नक्कीच गौरव करेल असे उद्गार पवार यांनी काढले.
यावेळी भाजपा मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, भाजपाचे अर्जुन म्हात्रे, निखिल चव्हाण, नितीन चौधरी, रवी दुबे, प्रिया शर्मा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान डॉ. आंनदीबाई जोशी स्मारक प्रकल्पाबाबत नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 2023 सालापासून पाठपुरावा करत असून या स्मारकाला राज्य सरकारने मंजूरी देखील दिली आहे. या कामासाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरवात होऊन काम पूर्णत्वास येणार असल्याचा विश्वास नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
.jpg)

Post a Comment
0 Comments