संत निरंकारी मिशन मार्फत महात्मा गांधी जयंती दिनी राबविले स्वच्छता अभियान
ब्लॅक अँड व्हाईट/कल्याण वार्ताहर
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानासह अनेकानेक सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या संत निरंकारी मिशनच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी कित्येक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सामान्य रुग्णालय, वाशी, नवी मुंबई याची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता अभियानात संत निरंकारी सेवादल व अन्य भाविक भक्त मिळून सुमारे 165 निरंकारी भक्तांनी भाग घेतला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.अजय गडदे, मेडिकल ऑफिसर प्रशांत जावडे आणि मेडिकल सोशल वर्कर सरिता खेरवासिया यांनी हे अभियान राबविण्यासाठी अत्यंत मोलाचे सहकार्य केले. पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विरेंद्र पवार यांनी अभियाना दरम्यान उपस्थित राहून स्वयंसेवकांचे उत्तम मार्गदर्शन केले. मिशनच्या स्थानिक शाखेचे मुखी अनिल शिंदे आणि सेवादल संचालिका पूजा पिंगळे यांच्या नियोजनानुसार व देखरेखीखाली हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले.तर संत निरंकारी मिशनच्या जसखार (उरण) शाखेमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, वहाळ, उलवे नोड येथेही महात्मा गांधी जयंती दिनी स्वच्छता अभियान राबवून शाळा आणि परिसर चकाचक करण्यात आला. या अभियानामध्ये संत निरंकारी सेवादलाच्या महिला व पुरुष स्वयंसेवक मिळून सुमारे 150 निरंकारी भक्तांनी आपल्या सेवा मोठ्या तन्मयतेने अर्पण केल्या.
भारतीय रेल्वेच्या स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमा अंतर्गत संत निरंकारी मिशन मार्फत मुंबईच्या भायखळा रेल्वे स्टेशनच्या आत व बाहेरील परिसरात व्यापक स्वच्छता अभियान आणि स्वच्छतेच्या प्रति जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या प्रचार प्रसार विभागाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ.दर्शन सिंह आणि सेवादलचे क्षेत्रीय संचालक ललीत दळवी यांच्या सान्निध्यात सद्गुरु चरणी प्रार्थना करुन करण्यात आला. मुंबई सेवादल क्षेत्र IV चे क्षेत्रीय संचालक शंकर सोनावणे यांच्या देखरेखीखाली मिशनच्या डिलाईल रोड, वरळी आणि लोअर परळ शाखांतील सेवादल स्वयंसेवक तसेच अन्य निरंकारी भक्तांनी मिळून सुमारे 140 स्वयंसेवकांनी या अभियानात भाग घेतला.
या स्वच्छता अभियाना अंतर्गत चालविण्यात आलेल्या जनजागृती अभियानामध्ये मिशनच्या शिवडी युनिटच्या 16 सेवादल सदस्यांनी अत्यंत प्रभावशाली रूपात पथनाट्य सादर करुन स्वच्छतेविषयी बहुमूल्य संदेश प्रसारित केला ज्याचे उपस्थित जनसामान्यांनी कौतुक केले. या अभियाना दरम्यान मिशनचे प्रबंधक आणि रेलवे अधिकाऱ्यांसह अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्वयंसेवकांनी स्वच्छतेविषयी प्रतिज्ञाही घेतली. अभियानात उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये आर.के.मोदी (सिनियर डीओएम), गणेश स्वैन (स्टेशन मैनेजर), उपेंद्रसिंह डगर (सिनियर आयपीएफ), अश्वनी सिंह (क्लिलीनेस) आणि विविध गुप्ता (डीवायएसएन) यांचा समावेश होता.
स्थानीय आमदार यामिनी जाधव यांनी या अभियानाला सदिच्छा भेट दिली आणि संत निरंकारी मिशन मार्फत मानवतेच्या प्रति केल्या जात असलेल्या निष्काम सेवांची स्तुती केली.
.jpg)



Post a Comment
0 Comments